सोडून गेलेले अनेक नेते राष्ट्रवादीच्या पुन्हा संपर्कात

0

पोट निवडणुकीच्या निकालातून भाजपची लाट ओसरल्याचे स्पष्ट
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दावा

पिंपरी-चिंचवड : भाजप सत्तेला चार वर्ष होत आली तरी, आश्‍वासनांची पूर्तता झाली नाही. त्याउलट महागाई गगनाला भिडली आहे, शेतकर्‍यांच्या आत्महत्त्या सुरुच आहेत, देशात पहिल्यांदाच राज्यातील शेतकरी संपावर गेला. हा संप सोडविताना दिलेली आश्‍वासने अद्यापही पूर्ण केली नाहीत. त्यामुळे शेतकरी पुन्हा संपावर जाण्याच्या तयारीत आहे. पेट्रोल, डिझेलचे भाव भयंकर वाढले आहेत. यातून सरकार लूट करत आहे. यामुळे भाजपविरोधात राज्यातील जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. ही नाराजी आगामी निवडणुकीत देखील कायम राहील, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. तसेच राष्ट्रवादी सोडून गेलेले अनेक नेते आपल्या संपर्कात असल्याचा दावा देखील त्यांनी केला.

भाजपाची न पेलणारी आश्‍वासने
मोदी लाटेमुळे शहरातून भाजपचे खासदार, आमदार निवडून आले. त्यांनी विकासाची स्पप्ने दाखविली. त्यामुळे त्यांना शहरात मते मिळाली असून शहरात भाजप वाढत आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. सत्तेत येण्यासाठी भाजपने जनतेला भरमसाठ आश्‍वासने दिली. परंतु, एकही आश्‍वासन ते पूर्ण करु शकले नाहीत असे सांगत जयंत पाटील म्हणाले, आम्ही पूर्ण करता येऊ शकतील, तीच आश्‍वासने जनतेला देतो. आगामी निवडणुकीत देखील जे काम करणे शक्य आहे, तेच जनतेला सांगणार आहोत. भाजप सध्या विविध ’चॅलेंज’ देत आहे. आम्ही कोणतेही चॅलेंज देणार नाहीत. लोकांची मने जिंकून त्यांच्यासमोर नम्रपणे जाणार असून त्यांचा कौल घेणार आहोत

नागपूर गुन्हेगारांची राजधानी
राज्यात पहिल्यांदाच पेट्रोल 85 रुपये झाले आहे. आमचे सरकार असताना 60 रुपये दराने पेट्रोल असले तरी भाजपचे लोक आंदोलने करत होती. आता 85 रुपये पेट्रोल झाले तरी ते शांत आहेत. पेट्रोलचे दर वाढवून सरकार लूट करत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. मुख्यमंत्र्याचे नागपूर शहर गुन्हेगारांची राजधानी झाले आहे. राज्यातील पोलिसच गुन्हे करत आहेत. गुन्ह्यात पोलिसांचा सहभाग वाढत चालला आहे. संरक्षकच भक्षक होत आहे. मुख्यमंत्र्यांचे गृहखात्यावर कसलेच नियंत्रण राहिले नाही

भाजपा नेत्यांचीच नाराजी
राष्ट्रवादीतून भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले अनेक नेते आपल्या संपर्कात आहेत. त्यांची भाजपमध्ये घुसमट होत आहे. त्या पक्षात ते नाराज असून गेल्या काही दिवसांपासून आपल्या संपर्कात आहे. काही कामानिमित्त भेटल्यास ते आपली नाराजी बोलवून दाखवितात. मी त्यांच्या गाठीभेटी घेत आहे. अनेक जण पक्षात परत येणासाठी इच्छुक आहेत. परंतु, पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्षासोबत राहिलेल्यांना विचारात घेऊन त्यांच्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असेही पाटील यांनी सांगितले.