सोनई तिहेरी हत्याकांडातील 6 नराधम दोषी

0

नाशिक : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील सोनई येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणातील 7 पैकी 6 जणांना न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवले. या 6 नराधमांना 18 जानेवारीला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. 1 जानेवारी 2013 रोजी सोनई येथे आंतर जातीय प्रेम प्रकरणातून हे हत्याकांड घडले होते. सीमा दरंदले या मुलीचे महाविद्यालयातील सफाई कर्मचार्‍याबरोबर प्रेम प्रकरण होते. सचिन सोहनलाल घारु (23) असे त्या तरुणाचे नाव होते. पण सीमाच्या कुटुंबीयांना ते मान्य नव्हते. यानंतर सचिन घारूसह त्याचे आणखी दोन मित्र संदीप राजू धनवार (24) आणि राहुल कंडारे (26, तिघे रा. गणेशवाडी, सोनई, तालुका नेवासा) यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

परिस्थितीजन्य पुराव्यानुसार दोष निश्‍चित
या हत्याकांडातील आरोपी प्रकाश विश्‍वनाथ दरंदले, रमेश विश्‍वनाथ दरंदले, पोपट विश्‍वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक रोहिदास फलके, अशोक नवगिरे, संदीप कुर्‍हे यांना पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने 6 जणांना दोषी ठरवले आहे. त्यांच्या शिक्षेसंदर्भात 18 जानेवारीला सुनावणी होणार आहे. याप्रकरणातील अशोक फालके याची पुराव्याआभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली. 1 जानेवारी रोजी आरोपीच्या वकिलांनी केलेल्या युक्तीवादास सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी उत्तर दिले होते. एकूण 53 साक्षीदारांच्या तपासणीनंतर नाशिक जिल्हा सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी दोष निश्‍चित करण्यासाठी 15 जानेवारी तारीख दिली होती. त्यानुसार सोमवारी आरोपींवर दोष निश्‍चित करण्यात आले. या खटल्यातही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हते, केवळ परिस्थितीजन्य पुराव्यानुसार आरोपींवर दोष निश्‍चित करण्यात आल्याचे उज्ज्वल निकम यांनी सांगितले.

असे घडले सोनई तिहेरी हत्याकांड
सचिन घारु या मेहतर समाजातील तरुणाचे सवर्ण मुलीवर प्रेम होते. ते लग्न करणार होते. मात्र तिच्या कुटुंबाने कट रचून 1 जानेवारी 2013 रोजी सचिनची हत्या केली. यावेळी सचिनच्या हत्येची कुणकुण लागल्याने कुटुंबाने सचिनचे मित्र संदीप राजू धनवार आणि राहुल कंडारे यांचीही हत्या केली. तसेच सचिनच्या मृतदेहाचे तुकडे करुन कूपनलिकेत टाकले होते. तर आरोपींनी संदीप धनवार आणि राहुल कंडारे यांचे मृतदेह कोरड्या विहिरीत पुरले होते. याप्रकरणी सीआयडीने 7 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.