सोनखेडी येथे शेततळ्यात बुडून तरूणाचा मृत्यू 

0
अमळनेर- पोहायला गेलेल्या तरुणाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील सोंनखेडी शिवारात  घडली.  निखिल उर्फ भटु संजय पाटील रा सोंनखेडी असे या तरूणाचे नाव आहे. निखिल हा दुपारी मनोहर पाटील यांच्या शेतातील मोठ्या शेततळ्यात पोहण्यासाठी गेला होता. त्याने काठावरून उडी मारल्याने तो गाळात फसला ही घटना गावकर्‍यांना कळताच गावकरी घटनास्थळी पोहचले एकाने त्याला बाहेर काढले आणि ताबडतोब डॉ.अनिल शिंदे यांच्या रूग्णालयात आणले, तोपर्यंत निखिलचा मृत्यू झाला होता.
ग्रामीण रूग्णालयात डॉ प्रकाश ताळे यांनी शवविच्छेदन केले. निखिल आयटीआयचा विद्यार्थी होता. तसेच तो ट्रॅक्टर चालक म्हणूनही काम करीत होता. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने नाले, शेततळे पूर्ण भरले आहेत. शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना आहे. तीन दिवसांपूर्वी नगाव येथील इसमाचा ही शेततळ्यात बुडून मृत्यू झाला होता. सोनखेडीचे पोलीस पाटील गुलाब पाटील यांनी खबर दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस नाईक सुनील पाटील करीत आहेत.