सोनगीरजवळ गुजरातच्या व्यापार्‍यांवर पिस्तूल रोखून 15 लाखांची रोकड लांबवली

0

हातपाय बांधून दोंडाईचा रस्त्यावर नेत मारहाण; पोलिसात गुन्हा दाखल

धुळे – तालुक्यातील सोनगीरमार्गे सुरतच्या दिशेने निघालेली स्विफ्ट कार पिस्तूलचा धाक दाखवून थांबवण्यात आली. या कारमध्ये असलेल्या गुजरातमधील दोन व्यापार्‍यांना दोंडाईचा रस्त्यावर नेऊन मारहाण करण्यात आली. शिवाय त्यांच्याकडील सुमारे 15 लाख रुपये लुटण्यात आले. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर पसार झालेल्या सहा दरोडेखोरांविरुद्ध सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सायंकाळी ठसेतज्ज्ञांनी पुरावे जमा केले. शिवाय टोलनाका व हॉटेल्सवरून सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज घेतले. दरोडेखोरांच्या तपासासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे.

सहा लुटारूंविरुद्ध सोनगीर पोलिसात गुन्हा
गुजरात राज्यातील पाटण येथील व्यापारी चमनभाई वाहजीभाई पटेल, जयप्रकाश जयंतीलाल पटेल हे दोघे इंदूरला गेले होते. पटेल हे स्विफ्ट कारने (जी जे 05/ आर सी 0156) सुरतकडे निघाले होते. ही कार प्रवीणसिंग दरबार चालवत होता. मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गाने कार धुळे शहराच्या दिशेने येत असताना सोनगीरपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर इनोव्हा कार त्यांना आडवी आली. कारमधून सहा जण उतरले. त्यापैकी एकाने पिस्तूल काढून दरबार व पटेल यांच्या दिशेने रोखले. त्यानंतर चालकासह तिघांना त्यांच्या वाहनात हातपाय बांधून बसवण्यात आले. नंतर त्यांना कारसह दोंडाईचा रस्त्याच्या दिशेने नेले. अंधारात उतरवल्यावर तिघांना मारहाण करत 15 लाख 55 हजार 200 रुपये लुटून नेले. याशिवाय तिघांकडील मोबाइल, एटीएम कार्ड, लायसन्स हे दरोडेखोर घेऊन पसार झाले. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यानंतर चमनभाई, जयप्रकाश व प्रवीणसिंग यांनी सोनगीर गाठले. सकाळी सोनगीर पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरून अज्ञात सहा लुटारूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

व्यवहार न झाल्याने रोकड लागली लुटारूंच्या हाती
दोन दिवस इंदूरला मुक्काम : पटेल हे जुने जेसीबी व मोठी अवजड वाहने खरेदी करतात. या व्यवहारासाठी तिघेही इंदूरला आले होते. दोन दिवस थांबूनही व्यवहार न झाल्यामुळे लाखोंची रोकड घेऊन ते निघाले, परंतु लुटारूंना याची माहिती कशी मिळाली? या एका प्रश्नावरून पोलिस आता दरोडेखोरांचा तपास करत आहे.