सोनगीरला तापीतून पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव सादर करा

0

धुळे। तालुक्यातील सोनगीर गावाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी तापी नदीतून नवीन उद्भव घेऊन मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा योजना राबविण्यात येईल. यासाठी जिल्हा परिषदेमार्फत या योजनेचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे ताबडतोब पाठविण्याचे आदेश आ.कुणाल पाटील यांनी दिले आहेत.

पाणीप्रश्न निकाली काढावा यासाठी ग्रामपंचायतीसमोर उपोषण
सोनगीरचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा, या मागणीसाठी येथील दलितमित्र दिलीप सुका माळी यांनी ग्रामपंचायतीसमोर उपोषण सुरू केले होते. त्यांच्या उपोषणाची व सोनगीरकरांच्या पाण्याच्या प्रश्नाची दखल घेत आ.पाटील यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत आपल्या प्रतिनिधींमार्फत माळी यांनी उपोषण मागे घेतले. सोनगीर गावाचा पिण्याचा पाणीप्रश्न गंभीर बनत चालला आहे. जलस्त्रोत आटल्याने गावाला पाच ते सात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीमार्फत पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न होत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होत असतो. म्हणून हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यात यावा, यासाठी तापी नदीवरून पाणीपुरवठा योजना राबवावी.

लवकरच मंत्र्यांबरोबर बैठक
आ.पाटील यांनी गटविकास अधिकारी उल्हास सोमवंशी, ग्रा.पा.पु. उपअभियंता एस. बी. सोनवणे यांना सूचना केली. त्यानुसार आ.पाटील यांचे प्रतिनिधी म्हणून जि.प.समाजकल्याण सभापती मधुकर गर्दे यांनी संबंधित अधिकार्‍यांसमवेत सोनगीर येथे उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली व आ.पाटील यांनी भ्रमणध्वनीव्दारे दिलीप माळी यांच्याशी संपर्क साधत सांगितले की, सोनगीरच्या प्रश्नाबाबत लवकरच संबंधित मंत्र्यांबरोबर बैठक घेऊन योजनेला गती देण्याचे आश्‍वासन दिले. श्री. माळी यांचे उपोषण सोडतांना प्रभारी सरपंच धनंजय कासार, प्रकाश पाटील, शाखा अभियंता व्ही. आर. पवार, विशाल मोरे, चंद्रशेखर परदेशी, वाल्मीक वाणी, वसंत वाणी, राजेंद्र जाधव, पराग देशमुख, दिनेश देवरे, ग्रामसेवक अविनाश बैसाणे आदी उपस्थित होते.