सोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक

धुळे : तालुक्यातील सोनगीर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे राज्यात प्रतिबंधीत असलेला सुमारे 28 लाखांचा गुटखा जप्त केला असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. चालक मुस्तकीम शेख राजू (33, साक्री रोड, मोतीनाला, मोगलाई, धुळे) व जुल्फेखार शेख नूर मोहम्मद (34, रा.महात्मा फुले चौक, नेर, ता.धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई
सोनगीर पोलीस ठाण्याचे सहा.निरीक्षक प्रकाश पाटील यांना गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी मध्यरात्री नाकाबंदी लावण्यात आली. सोमवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास दोंडाईचाकडून धुळ्याकडे टाटा अल्ट्रा (एम.एच.15 एफ.व्ही.8855) आल्यानंतर तिची झडती घेतली असता त्यात सुरूवातीला केमिकलचे ड्रम, प्लॉस्टीकचे युज अ‍ॅण्ड थ्रो ग्लासचे बॉक्स आढळले मात्र वाहनाची बारकाईने पाहणी केली असता त्यात 48 गोण्यांमध्ये प्रतिबंधीत गुटखा आढळला. पंचासमक्ष त्याची मोजणी केली असता 28 लाख तीन हजार 840 रुपये किंमतीचा गुटखा व दहा लाख रुपये किंमतीचे वाहन मिळून एकूण 38 लाख तीन हजार 84 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, चालकाच्या चौकशीत जप्त केलेला माल हा शंकर खत्री (दोंडाईचा), बालाजी गणपत (बार्डोली, गुजरात) व मुक्तार एफएम ट्रान्सपोर्ट, वापी गुजरात यांचा असल्याची कबुली दिल्याने संबंधितानाही या गुन्ह्यात आरोपी केले जाणार असल्याची माहिती सहास.निरीक्षक प्रकाश पाटील यांनी दिली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक प्रकाश पाटील, हवालदार शामराव अहिरे, हवालदार अजय सोनवणे, हवालदार संदेसिंग चव्हाण, नाईक संजय जाधव, नाईक शिरीष भदाणे, कॉन्स्टेबल अतुल निकम यांच्या पथकाने केली.