सोनगीर पोलिस ठाण्याचा कर्मचारी पंटरसह एसीबीच्या जाळ्यात
20 हजारांची लाच भोवली : धुळे एसीबीच्या कारवाईने लाच स्वीकारताच आवळल्या मुसक्या
भुसावळ/धुळे : सोनगीर पोलिस ठाण्याच्या कर्मचार्यासह जप्त केलेली दुचाकी सोडण्यासाठी 20 हजारांची लाच मागून ती पंटराच्या माध्यमातून स्वीकारताना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. गुरुवारी सायंकाळी तालुक्यातील देवभाने जिल्हा परीषद शाळेसमोर लाच घेताना सापळा यशस्वी करण्यात आला. पोलिस नाईक संजय मधुकर जाधव व ज्ञानेश्वर कोळी अशी अटकेतील लाचखोर आरोपींची नावे आहेत.
असे आहे नेमके प्रकरण
तक्रारदार धुळ्यातील रहिवासी असून त्यांच्या भावाच्या लग्नासाठी त्यांनी परीचीत मित्राकडून दुचाकी घेतली होती व घरासमोर लावली होती मात्र दहा मिनिटांचे काम असल्याचे सांगून ओळखीच्या मुलांनी अॅक्टीव्हा नेल्यानंतर पोलिस नाईक संजय जाधव यांनी गस्तीदरम्यान पकडल्यानंतर त्यांच्याकडे दारूच्या बाटल्यांचे बुच आढळल्याने दुचाकी ताब्यात घेवून मुलांना सोडून दिले होते. तक्रारदार हे दुचाकी घेण्यासाठी गेल्यानंतर 75 हजारांची मागणी जाधव यांनी केली व पैसे न दिल्यास भावाविरोधात गुन्हा दाखल करण्याची धमकीदेखील देण्यात आली. तक्रारदाराने बुधवारी धुळे एसीबीकडे तक्रार केल्यानंतर गुरुवारी लाच पडताळणी करून सापळा रचण्यात आला. गुरुवारी सायंकाळी तालुक्यातील देवभाने जिल्हा परीषद शाळेसमोर लाच घेताना पंटर ज्ञानेश्वर कोळी याच्या माध्यमातून लाच स्वीकारताना पोलिस नाईक संजय मधुकर जाधव यास अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मंजीतसिंग चव्हाण, निरीक्षक प्रकाश झोडगे, राजन कदम, शरद काटके, कैलास जोहरे, भूषण खलाणेकर, संतोष पावरा, भूषण शेटे, गायत्री पाटील, संदीप कदम, रोहिणी पवार, रामदास बारेला, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, प्रशांत बागुल, प्रवीण पाटील, वनश्री बोरसे आदींच्या पथकाने यशस्वी केला.