सोनपावलांनी आली ‘गौराई’

0

पुणे । अनुराधा नक्षत्रावर सोन्या मोत्यांच्या पावलांनी मंगळवारी ज्येष्ठा गौराईंचे घरोघरी आगमन झाले. कुलाचाराप्रमाणे उभ्या व खड्यांच्या गौरींचे पूजन करण्याची प्रथा व परंपरा आहे. या विधीवत पद्धधतीने तिचे स्वागत करण्यात आले. शहरात पारंपारिक पद्धतीने रितीरिवाज पाळत गौराईला घरी आणले गेले. परंपरेप्रमाणे घराच्या उंबर्‍यातून आत आणताना, जिच्या हातात गौरी असतील त्या महिलेचे पाय दुधाने व पाण्याने धुतात आणि त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढतात. घराच्या दरवाजापासून ते जिथे गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत गौरींचे मुखवटे आणले जातात. त्यावेळी ताट चमच्याने वाजवत आवाज केला जातो.

पारंपारिक गाण्यांनी स्वागत
गौराईची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दुध-दुभत्याची जागा इ. गोष्टी दाखविण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी लोक तेरड्याची रोपे एकत्र बांधून तिच्यावर मातीचा मुखवटा चढवितात. नंतर त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्यांनी सजवितात. शहरात गौरींना नव्या वस्त्रालंकारांनी साज शृंगार करून सजविण्यात आले होते. त्यानंतर अनेक घरांमध्ये गौरीला सोन्याचे दागिने घालण्याची प्रथा आहे. पारंपरिक गाणी म्हणत गौरींची पुजा करण्यात आली.

भाजी, भाकरीचा नैवेद्य
गौरी बसविल्यावर त्यांना मेथीची भाजी, भाकरीचा नैवेद्य देखिल दाखविण्यात आला. वस्त्रालंकारानी-आभूषणांनी सजवलेल्या या गौरीचे बुधवारी लाड पुरविले जाणार. अनेक घरात गोड नैवेद्यही दाखवला जातो. पंचपक्कवानाचा स्वयंपाकसुध्दा गौरींसाठी केला जातो. गौरीच्या जेवणासाठी लागणार्‍या भाज्या घेण्यासाठी सकाळपासून महिलांनी गर्दी केली होती.