अथेंस । जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेचा चौथा दिवस भारतासाठी यशदायी ठरला. भारताने गुरुवारी स्पर्धेत एक सुवर्णपदक आणि एक कांस्यपदक मिळवले. भारताची महिला पेहलवान सोनमने 56 किलोगटात सुवर्णपदक जिंकले तर 43 किलोगटात भारताच्या निलमला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.सोनमने पहिल्या फेरीत लिथुआनियाच्या व्हिक्टोरिया अग्सुतायुस्केला 7-0 असे हरवले. दुसर्या फेरीत सोनमने हंगेरीच्या अॅना हेलाला 6-6 असे बरोबरीत रोखत विजय मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत सोनमने मॉलडोव्हने इरिना रिनगकीला 9-6 असे हरवून उपांत्य फेरीत धडक मारली. अंतिम फेरीचा मार्ग मोकळा करताना सोनमने स्विडनच्या इडा एमा डायनावर 11-8 असा विजय मिळवला.
अंतिम फेरीतही आपला दबदबा राखताना सोनमने जपानच्या सेना नागामोटाला 3-1 अशी मात देत सुवर्णपदकावर कब्जा केला. 43 किलोवजनी गटात भारताच्या नीलमला रोमानियाच्या रोक्साना अॅलेक्झांडरकडून 4-6 असा पराभव पत्कारावा लागल्याने कांस्यपदकावर प्रवास थांबवावा लागला. अन्य लढतींंमध्ये भारताच्या सिमरन (40 किलो), मनीषा (46 किलो), मिनाक्शी (52 किलो) आणि करुणा (70 किलो) उपांत्य फेरीत पराभूत झाल्यामुळे कांस्यपदकाच्या शर्यतीत कायम आहेत.