खड्डा चुकविण्याच्या नादात ट्रक चालकाचा ताबा सुटला
शहादा – शहादा शिरपूर रस्त्यावर सोनवद फाटाजवळ गोशाळा समोर महामार्गावरील खड्डा चुकविताना ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या मोटरसायकल स्वारास जोरदार धडक दिल्याने अक्षय उर्फ विनायक सुरेश जव्हेरी (वय-27, रा. महालक्ष्मी नगर) शहादा या युवकाचा जागीच ठार झाला आहे.
आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अक्षय उर्फ विनायक जव्हेरी हा युवक शिरपूर येथून शहाद्याकडे पॅशन प्रो मोटारसायकल क्रमांक (एमएच 39 पी 8619) येत असताना समोरून शिरपूरकडे जाणारा ट्रक क्रमांक (जीजे 01 डीझेड 0216) या ट्रकने सोनवद फाटा व गो शाळेसमोरील रस्त्याच्या मधोमध असलेल्या ठिकाणी समोरासमोर जोरदार धडक दिली. अपघातात त्याच्या डोक्याला व छातीला जबर मार लागला त्यातून रक्तप्रवाह होऊ लागल्याने गंभीर जखमी झाला. स्थानिकांच्या मदतीने त्यास उपचारासाठी पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याने अधिक उपचारासाठी त्यास नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले असता सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.
सर्व मित्रांनी व नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयात धाव घेतली अक्षय मयत झाल्याचे कळताच नातेवाईकांसह मित्रपरिवाराने हंबरडा फोडला अक्षयच्या अपघाती निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अक्षयच्या पश्चात एक मोठा भाऊ दोन मोठ्या बहिणी व आई वडील असा परिवार आहे. अपघात घडल्यानंतर अक्षयच्या मदतीसाठी सोनवद येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दीपक पाटील व सहकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी पुंडलिक सपकाळे, सारंग खेड्याचे सपोनि रमेश न्हायदे यांच्यासह रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या वाहन चालकांनी मदत केली सदर घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.