सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ

0

एका दिवसात सव्वालाखाचे दागिने लंपास

पुणे । पोलिस बंदोबस्तात व्यस्त असल्याचे पाहून सोनसाखळी चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. देखावे पाहण्यासाठी आलेल्या भाविकांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. गुरुवारी (31 ऑगस्ट) शहरात 2 ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या असून यामध्ये सव्वालाख रुपयांच्या दागिन्यांसह 25 हजार रुपयांची रोकड चोरून नेली.

हडपसर परिसरातील अमृता ढकवळ (वय 32) या रात्री 11 वाजण्याच्या सुमारास दगडूशेठ हलवाई गणपती व तुळशीबाग गणपती परिसरात असताना अज्ञात सोनसाखळी चोरांनी त्यांचे 1 लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरून नेले. वानवडीतील भवानीशंकर बेहरा (वय 36) हे पत्नी आणि मुलीसह महात्मा फुले भाजी मंडई परिसरात गणपती पाहत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या मुलीच्या गळ्यातील 30 हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेली. तिसरी घटना ही दगडूशेठ हलवाई गणपती मंडपात घडली. बुधवार पेठेतील स्वप्नील फुगे (वय 46) हे मान्यवरांचा सत्कार करत असताना अज्ञात इसमाने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या खिशातील 25 हजार रुपये चोरून नेले. याप्रकरणी विश्रामबागवाडा पोलिस अधिक तपास करीत आहेत.