मुंबई – सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांतील चार रेकॉर्डवरील आरोपींना अंधेरी पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. या चौघांविरुद्ध अनेक सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची नोंद असून त्यांच्या अटकेने अशाच अन्य काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अटकेनंतर या चौघांनाही अंधेरीतील स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींकडून पोलिसांनी शंभर ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि एक चोरीची मोटारसायकल जप्त केली आहे.
नईम शबदरअली अन्सारी, धीरज जोगिंदर कनोजिया, जाफर मेहमूद खान ऊर्फ चिकना आणि अब्दुल समद ऊर्फ शोएब हमीद हमदारे अशी या चौघांची नावे आहेत. चारही आरोपी सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अनेक सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. अंधेरी परिसरात वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनेने अंधेरी पोलिसांनी अशा चोरट्यांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच नईम अन्सारीसह त्याच्या तिन्ही साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती. चौकशीत ते चौघेही सोनसाखळी चोरीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. चारही आरोपी वांद्रे परिसरात राहत असून त्यांनी मोटारसायकलवरुन मुंबईसह इतर शहरात सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. यातील जाफर खान हा टोळीचा मुख्य आरोीप आहे. त्याच्याविरुद्ध 45 हून अधिक सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. इतर तिघांमध्ये नईमविरुद्ध 22, धीरजविरुद्ध 28 तर अब्दुलविरुद्ध 33 सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी एक चोरीची मोटारसायकल आणि शंभर ग्रॅम वजनाचे सोनसाखळी जप्त केले आहेत. पोलीस उपायुक्त नवीन रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अंधेरी पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले.