नवी दिल्ली – संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची तब्येत काल रात्री अचानक बिघडली. शिमला येथे प्रियांका गांधी यांचा बांधण्यात येत असलेला बंगला पाहण्यासाठी सोनिया गेल्या होत्या. गुरुवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना तातडीने शिमला येथीलच इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर चंदीगढमार्गे विशेष विमानाद्वारे नवी दिल्लीत आणण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती आता स्थीर असून, वैद्यकीय निगरानीखाली आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्येदेखील सोनियांची तब्येत अशीच अचानक खराब झाली होती. तेव्हादेखील त्या शिमलामध्येच होत्या. त्यानंतर त्यांच्यावर विदेशात उपचार करण्यात आले होते.
श्वास घेण्यास झाला त्रास
शिमला येथे प्रियांका वढेरा-गांधी यांचा बंगला बांधल्या जात आहे. या बंगल्याची पाहणी करण्यासाठी सोनिया गांधी या गुपचूप आल्या होत्या. छराबडा येथे असताना त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे तातडीने त्यांना आयजीएमसीमध्ये दाखल करण्यात आले. नवी दिल्लीला नेण्यासाठी हवाई रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने वरिष्ठ शल्यचिकित्सक डॉ. रमेश चंद यांच्या निगरानीखाली त्यांना कारद्वारे चंदीगढ येथे आणण्यात येऊन तेथून विशेष विमानाद्वारे नवी दिल्लीला हलविण्यात आले. याबाबत डॉ. चंद यांनी सांगितले, की सोनियांची तब्येत बिघडल्याची सूचना रात्री 11 वाजता मिळाली होती. त्यांना रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला. परंतु, त्यांनी दिल्लीला जाणे पसंत केले. सोनिया गांधी यांची तब्येत सद्या ठीक राहात नसून, 2011 मध्ये त्यांच्यावर अमेरिकेत शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर वारंवार त्यांना वैद्यकीय उपचारासाठी अमेरिकेत जावे लागत आहे. प्रकृती अस्वस्थतेमुळेच त्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले होते.