नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अखेर राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे शुक्रवारी जाहीर केले. काँग्रेसचे अध्यक्ष तसेच सोनिया गांधी यांचे पुत्र राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची धुरा स्वाधीन करत सोनिया गांधी यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. गेल्या काही काळापासून त्या सक्रीय राजकारणापासून लांब आहेत. तसेच नुकत्याच झालेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश येथील निवडणुकीसाठी त्यांनी प्रचारदेखील केला नाही. त्यामुळे आता त्या राजकारणातून निवृत्त होणार असे चिन्ह दिसत होते, आणि शुक्रवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपली निवृत्ती जाहीर केली.
या मागे त्यांचे आरोग्य हेदेखील मोठे कारण असू शकते. गेल्या काही काळापासून त्यांना आरोग्यासंबंधी तक्रारी असल्याचेदेखील वृत्त आले होते, इटली येथे त्यांचा उपचार सुरु असल्याची माहितीदेखील मिळाली होती. सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी 1998 मध्ये स्वीकारली होती. तब्बल 19 वर्षे त्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी होत्या. 11 डिसेंबररोजी त्यांनी राहुल गांधी यांच्या खांद्यावर काँग्रेसपक्षाची जबाबदारी टाकली आणि त्यांनी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.