सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्यांचा भाजपशी संबंध; राहुल गांधी संतापले?

0

नवी दिल्ली: कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कॉंग्रेसच्या २३ नेत्यांनी पत्र लिहिले होते. या पत्राद्वारे गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीला अध्यक्ष पद देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. दरम्यान आज कॉंग्रेस कार्यकारी समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या नेत्यांवर संताप व्यक्त केला. सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या नेत्यांचा भाजपशी संबंध आहे का? असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केल्याची बातमी समोर आली आहे. मात्र कॉंग्रेस नेत्यांनी ही बातमी फेटाळून लावली आहे. राहुल गांधी यांनी असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही असे स्पष्टीकरण करण्यात आले आहे.

सोनिया गांधी यांना पत्र लिहिणारे २३ नेते हे माजी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष राहिलेले नेते आहेत. जर राहुल गांधी यांनी असे विधान केले असेल तर मोठ्या नेत्यांच्या मागणीला पक्षात किती महत्त्व आहे हा प्रश्न आहे.

राहुल गांधींच्या या विधानावरून आता कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही सातत्याने भाजपला लक्ष करत आलो आहे, भाजपच्या बाजूने आयुष्यात कधीही मत व्यक्त केलेले नाही, मात्र तरीही राहुल गांधी यांनी असे वक्तव्य केले असेल तर ते दुर्दैवी आहे असे विधान कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे.

परंतु राहुल गांधींनी असे वक्तव्य केले नसल्याचे कॉंग्रेस नेते सांगत आहेत.