मुंबई | सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारित ‘सचिन : अ बिलिअन ड्रीम्स’ हा चित्रपट स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता सोनी मॅक्स व मॅक्स २ या वाहिनीवर दाखवला जाणार आहे. स्वप्न पाहणार्या एका छोट्या मुलाची ही गोष्ट, क्रिकेटचा देव बनण्याचा त्याचा प्रवास आणि भारतातील सर्वात महान खेळाडूचा मान मिळवण्याची त्याची यशोगाथा या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवता येईल. एमी पुरस्कारात नामांकन मिळालेले ब्रिटिश फिल्ममेकर जेम्स एर्स्किन यांचे दिग्दर्शन आणि रवी भागचंदका यांची निर्मिती असलेला ‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’ हा चित्रपट म्हणजे चरित्रपर डॉक्युमेंट्री आहे, असे म्हणता येईल. यात तेंडुलकरचा क्रिकेटमधील प्रवास आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक संदर्भ आहेत. त्याचप्रमाणे याआधी कधीही प्रकाशात आल्या नव्हत्या अशा काही बाबीसुद्धा या सिनेमातून प्रेक्षकांना कळतील. या सिनेमात सामन्यांमधील काही प्रसंगांसोबतच खर्या प्रसंगांचे फुटेज, त्याचे सहकारी आणि कुटुंबिय तसेच विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीसारख्या तरुण पिढीतील खेळाडूंच्या मुलाखती आहेत. या बायोपिकमुळे मास्टर ब्लास्टर तेंडुलकरने अभिनयाच्या क्षेत्रातही पदार्पण केले आहे.
‘‘गेली २४ वर्षे प्रेक्षकांनी मैदानावरचा प्रत्येक क्षण माझ्या सोबत जगला आहे. पण, त्यावेळी माझ्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे, हे त्यांना ठाऊक नव्हतं. त्यांना माझा स्कोअर तोंडपाठ असेल, माझा प्रत्येक बॉल कसा खेळला गेला, हेसुद्धा त्यांना आठवत असेल. पण, या सिनेमातून त्यांना माझ्या मनात डोकावता येईल आणि आयुष्यातील चढ-उतारांमध्ये मी नेमका कसा विचार करत होतो, हे समजून घेता येईल. या सिनेमामळे कुटुंबासोबतचं माझं नातं जाणून घेता येईल आणि खर्या आयुष्यातील फुटेजमुळे माझ्या वैयक्तिक आयुष्यातील काही प्रसंगांमध्ये डोकावून पाहता येईल.’’
– सचिन तेंडुलकर