सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी सोमवारी केलेले काही ट्विट्स हे वादाच्या भोवर्यात सापडले.
ईश्वराची सर्वांवरच कृपा राहो. मी मुस्लीम नाही. तरीही मला रोज सकाळी अजानच्या आवाजाने उठावेच लागते. भारतातील या जबरदस्तीच्या धार्मिकतेचा कधी अंत होणार? हे त्यांचे पहिले ट्विट होते सकाळी साडेपाचचं. बहुधा फजरच्या नमाजच्या बांगेने सोनूंची झोपमोड झाली असावी. फजरची नमाज ही पहाटेची. दिवसातील पहिली नमाज. त्यानंतर काहीवेळातच त्यांनी अधिक कडक भाषेत दुसरे ट्विट केले. ते अधिक कडक भाषेत होतं. थेट प्रेषित महंमदांपर्यंत जाणारे. त्यांनी म्हटले, प्रेषित महंमदांनी इस्लाम स्थापन केला तेव्हा वीज नव्हती. मग हा गोंगाट का सहन करू? त्यांनी 5.36 वा. तिसरे ट्विट केले. भूमिका स्पष्ट करणारे. विजेचा वापर करून धर्म न मानणार्यांना लोकांना उठवणार्या कोणत्याही मंदिर-गुरुद्वारावर माझी श्रद्धा नाही, हे का खपवून घ्यायचे?
दिवसाच्या सुरुवातीचेच तीन ट्विट. खरंतर कलाकार हे तसे वादविवादापासून त्यातही धार्मिक वादांपासून दूर राहतात. एक गायक अभिजित सोडले तर कुणीही थेट धार्मिक वादामध्ये पडताना दिसत नाही. अभिजितही थेट एक घाव दोन तुकडे भूमिकेत वावरतात. सोनूंच्या बाबतीत मात्र तसे नव्हते. मग अचानक सोनूचे काय बिनसले असावे?
सोनू निगम राहतात त्या परिसरात काही मशिदी आहेत. त्या मशिदींमधून फजरच्या नमाजापासून बांग सुरू होते. पुन्हा मशीद एकच नाही, अनेक आहेत. त्यामुळे चला एक संपली आता झोपू, असेही नाही. एकामागोमाग एक सुरुच असतात. पुन्हा सकाळची झोप अशी की, काहींना ती एकदा उडाली की पुन्हा कितीही प्रयत्न केले तरी लाभत नाही. सोनूंचे तसेच झाले असावे. त्यामुळेच त्यांनी सकाळीच ट्विटरवर रौद्रराग सादर केला असावा, असे त्यांच्या संपर्कातील काहींचे म्हणणे आहे.
जे असेल ते असो. मात्र, आता त्यावरून वाद उसळला आहे. सोनू निगम यांनी दुसरे ज्येष्ठ गायक अभिजित यांच्याकडून हिंदुत्वाची शिकवणी घेतली. त्यांच्या तालमीत तयार झाल्यानंतर आता तेही कामे नसताना चर्चेत राहण्यासाठी असे वाद उकरुन काढत आहेत, अशी टीकाही झाली. काहींनी तर थेट तुम्ही हिंदूंच्या नवरात्रीबद्दल का बोलत नाहीत? वगैरेही प्रश्न उपस्थित केले. काहींनी त्यांना परस्पर उत्तरे देऊन नवरात्र नऊ दिवस तर अजान 365 दिवस असते, ती कशी चालवून घ्यायची? असेही विचारले. एकूणच सोनूंच्या सकाळच्या अजान ट्विटचा मुद्दा प्राइम टाइमपर्यंत लांबत गेला.
अर्थात, नेहमीप्रमाणे होतं तसेच झाले. वाद भडकला. चर्चा खूप झाली. मात्र, निष्कर्ष काहीच न काढता वाफ निघत राहिली. खरंतर हा एक महत्त्वाचा विषय आहे. सोनू निगम यांची मांडण्याची पद्धत चुकली असेल, मात्र मुद्दा चुकीचा म्हणता येणार नाही. मात्र, मुद्दा जेव्हा मुस्लीम धर्माबद्दलचा येतो तेव्हा आपल्या देशातील काही मुसलमानांपेक्षाही जास्त संवेदनशील होतात. जसे हिंदू तसेच मुस्लीम. आपण सारे भारतीयच. हिंदूंना जशी वाजत-गाजत सारे सण साजरे करण्याची सवय तशीच मुसलमानांनाही. त्यामुळेच इस्लाममध्ये संगीत वर्ज्य आहे असे म्हटले जाते, तरी सुफी संगीताची लोभस परंपरा त्या धर्मातील एका पंथात आहे. तसेच हिंदू मूर्तिपूजा करतात म्हणून त्यांना काफर ठरवणार्या इस्लामला मानणारे कोट्यवधी भारतीय दर्ग्यावर जाऊन बुतभक्ती करतातच. इस्लामचं भारतीयीकरण झालेले आहे. त्यामुळेच जनहिताच्या अनेक मुद्द्यांवरील हिंदूंची आणि मुसलमानांची मते समान असू शकतात. नव्हे असतातही. मात्र, मगाशी म्हटले तसे काही लोक मुसलमानांबद्दलच्या मुद्द्यांवर एवढे संवेदनशील होतात की, त्यांच्या प्रतिक्रियांमुळे परिस्थिती चिघळू शकते.
प्रदूषण ही सध्याची सर्वात गंभीर समस्या. मानवी जीवनाला धोका पोहोचवणारी. जल, वायू, माती प्रदूषण कोणतेही असो आपण जपलेच पाहिजे. ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा त्यामुळेच महत्त्वाचा. यामुळेच मागे न्यायालयाने कडक आदेश दिला. अनेक निर्बंध लादले गेलेत. ते योग्यच मानले गेले पाहिजेत. ते आपल्या फायद्यासाठीच आहेत. पुन्हा त्यात धर्मानुसार भेदभावही नाही.
ध्वनिप्रदूषण आटोक्यात ठेवण्यासाठी नागरी वस्त्यांमध्ये काही ठिकाणी शांतता क्षेत्र तयार केले गेलेत. तेथे एका मर्यादेपेक्षा जास्त तीव्रतेच्या आवाजांवर बंदी आहे. जसे रुग्णालय, शाळा, न्यायालय, सरकारी कार्यालये वगैरे. गंमत म्हणजे याच यादीत धार्मिक स्थळेही असतात. तिच धार्मिक स्थळे जेथे अजान, आरती, प्रवचनासाठी भोग्यांचा बिनदिक्कत वापर केला जातो. म्हणजे काही शांतता क्षेत्रेच अशांतता पसरवतात! त्यांच्याबद्दल कोणी बोलले तर लगेच वादाचा गोंगाट सुरू होतो. सोनू निगम यांच्याबाबतीत नेमकं तेच घडलं आहे. त्यांनी ट्विट केले ते चांगल्या मुद्द्यावर. मात्र, त्या भाषेला आक्षेप घेण्याऐवजी विरोध करणार्यांनी चर्चा धार्मिक वळणावर नेली आहे. हे योग्य म्हणता येणार नाही. काहींनी तर थेट हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यातून त्यांच्या हेतूबद्दलच शंका निर्माण होते. जर सोनू निगमच्या ट्विट हे समाजात तेढ निर्माण करतील असे तुम्हाला वाटते तर धार्मिक स्थळांवरील भोंगे मग ते मशिदींवरील अजानचे असो वा काही मंदिर वा अन्य धार्मिकस्थळांच्या धार्मिक कार्यक्रमातील असो, त्यामुळेही समाजाला त्रास होतो हे का नाही वाटत? हेही एक प्रचारचे वैचारिक प्रदूषणच. समाजाला तेवढेच घातक असलेले!