मुंबई : मुंबई महापालिकेची पोलखोल करणार्या आरजे मलिष्कावर 500 कोटींचा दावा ठोकणे म्हणजे शिवसेनेची बौद्धिक दिवाळखोरी निघाली आहे. त्यांच्या मेंदूत केवळ झोल झोल असून, त्यांची भूमिका गोल गोल राहिली आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी शिवसेनेवर केली. तर फडणवीस सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असतानाच ते गोल गोल आहे, त्यात झोल झोल आहे, या झोलमध्ये मुख्यमंत्र्यापासून काही मंत्री सहभागी आहेत. सोनू, सरकारवर आता भरवसा राहिला नाही, अशी कोटी करीत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारवर टीकास्त्र डागले. दरम्यान, राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधकांची मते फुटल्याने सत्ताधारी भाजप खुशीत असतानाच, रविवारी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील मतभेद उघड झालेेत. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरी आयोजित केलेल्या बैठकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने पाठ फिरवली आणि स्वतंत्र पत्रकार परिषद घेतली. पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु होत असून, त्यात, शेतकरी कर्जमाफी, कायदा-सुव्यवस्था, झोपू योजनेतील घोटाळा यासारख्या महत्त्वाच्या विषयांवरून विरोधक सरकारची कोंडी करणार आहेत.
मंत्रालयासमोर ढोल वाजवा!
पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आयोजित केलेल्या बैठकीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पाठ फिरवली असली तरी सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली. विखे पाटील यांच्या घरी आयोजित बैठकीला समाजवादी पक्षाचे अबू आझमी, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जोगेंद्र कवाडे, कपिल पाटील उपस्थित होते. परंतु गेल्या अनेक वर्षापासून आघाडीतील मित्र असलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली आणि स्वतंत्र पत्रकार परिषद घेतली. विखे पाटील यांनी यावेळी राज्य सरकारवर कडाडून टीका केली. राज्य सरकारची भूमिका ही सातत्याने बदलत असून, या सरकारने शेतकर्यांची फसवणूक केली आहे. राज्य सरकारने शेतकर्यांना जी 10 हजार रुपयांची मदत घोषित केली त्यामध्ये खूप अडचणी आहेत. मुंबई विद्यापीठाचे पेपर तपासणीसाठी नागपूरला पाठवले, अजून काय-काय नागपूरला पाठवणार आहात?, असा सवालही त्यांनी केला. बँकासमोर ढोल वाजवण्याची घोषणा करणार्या शिवसेनेने मंत्रालयासमोर ढोल वाजवावा, असा टोला विखे पाटील यांनी शिवसेनेला हाणला.
मुंडे आक्रमक
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी स्वतंत्र पत्रपरिषद घेत सरकारला धारेवर धरले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठनेते दिलीप वळसे पाटील हेही उपस्थित होते. हमीभाव, कर्जमाफी, नेवळीप्रकरण यावर सरकारला आम्ही जाब विचारणार आहोत, असे प्रारंभीच मुंडे यांनी स्पष्ट केले. मुंडे म्हणाले, ऐतिहासिक कर्जमाफीला एक महिना झाला; मात्र शेतकर्यांना कोणताच फायदा झाला नाही. शेतकर्यांनी आंदोलन केल्यानंतर सरकार घाबरले आणि त्याही निर्णयात संभ्रम आहे. जुलै महिना संपत आला. मराठवाड्यात काही ठिकाणी अजून पाऊस नाही. दुबार पेरणीची वेळ आली आहे. त्या सर्व शेतकर्यांना सरकारने अधिवेशनात अनुदान घोषित करावे, अशी आपण मागणी करणार आहोत, असे ते म्हणाले. समृद्धीमुळे शेतकरी भूमिहिन होणार आहे याकडे आपण सरकारचे लक्ष वेधणार आहोत. या कर्जमाफीच्या संदर्भात सरकार निधी कुठून आणणार याचा विचार झाला नाही, असे स्पष्ट करून मुंडे म्हणाले, की शिवसेनेसमोर ढोल वाजवायची वेळ आली आहे. सत्तेत असाल तर सरसकट कर्जमाफी द्या नाही तर बाहेर पडा, असे आव्हानही त्यांनी शिवसेनेला दिले.