सोनेखरेदीसाठी पॅनकार्ड लागणार!

0

अर्थनियामक समितीचा केंद्राला प्रस्ताव

नवी दिल्ली : दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला पॅनकार्ड स्वत:सोबत न्यावे लागणार आहे. सोने खरेदीसाठी पॅनकार्डची सक्ती करण्यासाठी अर्थनियामकांच्या समितीने तसा प्रस्ताव सरकारपुढे सादर केला आहे. सरकारने प्रस्तावाला मंजुरी दिल्यास सोन्याच्या व्यवहारांसाठी पॅनकार्ड बंधनकारक असणार आहे. सध्या दोन लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सोनेखरेदीसाठीच पॅनकार्ड बंधनकारक आहे. करचुकवेगिरी रोखण्यासाठी दैनंदिन रोखमर्यादा करण्यावरही या पॅनेलने भर दिला आहे.

करचुकवेगिरी टाळण्यासाठी योजनार उपाय
अर्थनियामकांच्या समितीने सादर केलेल्या अहवालामध्ये, सोन्याची तस्करी किंवा गुप्त व्यवहारांना आळा घालण्यासाठी प्रत्येक व्यवहाराची संगणकीय नोंद करण्याचा प्रस्ताव आहे. करचोरी टाळण्यासाठी प्रत्येक व्यवहाराची नोंद असणे आवश्यक आहे. तसेच करचोरी करणार्‍यांविरोधात कडक धोरणे राबवली जावीत, असेही समितीने म्हटले आहे. फायनान्शिअल स्टॅबिलिटी अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट काऊन्सिलच्या बैठकीनंतर काऊन्सिलच्या उपसमितीच्या शिफारसीनुसार घरगुती आर्थिक व्यवहारांच्या अभ्यासासाठी ही समिती गठीत करण्यात आली होती. लंडनच्या इम्पिरिअल कॉलेजमधील वित्तीय अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक तरुण रामादुराई या समितीचे अध्यक्ष आहेत. तसेच आरबीआय, सेबी, आयआरडीआयसारख्या नियामक संस्थांचे प्रतिनिधी या समितीमध्ये आहेत. समितीच्या म्हणण्यानुसार, दुसर्‍या देशांच्या तुलनेत भारतातील लोक घरात मोठ्या प्रमाणावर सोने ठेवतात. मग ते दागिन्यांच्या रुपात असो किंवा गोल्ड कॉईन्स आणि सोन्याची बिस्किटे. कर वाचवण्यासाठी घराच सोने साठवले जाते. मात्र हेच सोने बँक किंवा अन्य ठिकाणी ठेवून त्यावर व्याज मिळू शकते. त्यामुळे सोन्याचा असा साठा केला जाऊ नये यासाठीही प्रयत्न केले जातील, असेही समितीने म्हटले आहे.