भुसावळ। डोक्यावर कर्ज आहे म्हणून रडायचे नसते. काळ्या मातीची सेवा सोडायची नसते. निसर्ग कितीही कोपला तरीही एक दिवस सोनेरी पहाट उगवेल, या आशेने कितीही संकटे आली तरी शेतमाल उत्पादक शेतकरी दरवर्षी नव्या हंगामासाठी तयार असतो. सध्या पेरणीपूर्व हंगाम सुरु असून भर उन्हात शेतात कामे सुरू आहेत. या हंगामात नवीन बी-बियाणे घेण्यासाठी शेतकर्यांना कसरत करावी लागत आहे.
नवनवीन कंपन्यांचे बियाणे उपलब्ध
कृषिसेवा केंद्रात नवनवीन कंपन्यांचे बियाणे उपलब्ध झाले आहेत. महागडे बियाणे घेण्यासाठी पैशाची जुळवाजुळव सुरु आहे. काही शेतकरी उसनवारीने बियाणे घेत आहेत. गेल्या वर्षी काही शेतकर्यांनी रब्बी पिकांची पेरणी केली. मात्र ऐन पीक हाती येण्याच्या वेळेवर अकाली पावसाने थैमान घातले. चार ते पाच वेळा वादळी वारा व गारपिटीसह पाऊस झाल्याने शेतकर्यांचे नुकसान झाले.
गेल्या वर्षीच्या नुकसानीची भरपाई मिळेना
नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी असतानाही शासनाने याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे तालुक्यासह परिसरातील शेतकरी चांगलाच हवालदिल झाला होता. दरम्यान, अशाही परिस्थितीत आशावादी होत शेतकर्याने आगामी हंगामासाठी तयारी सुरू केली आहे. मात्र, बी-बियाणे आणि शेतीच्या मशागतीसाठी उसनवारीने पैसे घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
कृषी विभागाचे दुर्लक्ष
खरिपाच्या पेरणीसाठी शेतकरी सज्ज झाला असतानाच परिसरात बोगस बियाणे विक्रेते सक्रिय होत असतात नवनवीन वाणाची माहिती देऊन शेतकर्यांच्या माथी हे बियाणे मारले जातात. ही बाब कृषी विभागालाही माहीत आहे. कारवाई मात्र अपवादानेही झालेली नाही. अधिकाधिक उत्पादन घेऊन चांगला नफा मिळविण्याच्या उद्देशाने शेतकरी सर्वोत्कृष्ट निकाल देणार्या बियाण्याची खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत. हीच बाब हेरुन काही बोगस बियाणे त्यांच्या माथी मारत असल्याचे बोलले जात आहे.