पुणे । महापालिकेच्या 15 दवाखान्यांमध्ये बसवण्यात आलेल्या सोनोग्राफी मशिन्समध्ये महापालिकेचे जवळपास 70 लाख रुपये अधिक खर्च झाले आहेत. असे असूनही या मशीनचा व्यवस्थीत वापर होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांच्या खरेदीत लाखोंचा चुराडा झाला आहे. महिना उलटून गेला तरी त्याबाबत अद्याप चौकशी करण्यात आलेली नाही. आयुक्तांच्या आदेशालाच येथे केराची टोपली दाखविण्यात आली आहे. नागरिकांचे कर रुपातील पैसे वाया जात असताना प्रशासन मात्र ढिम्म बसल्याचे दिसून येते. या प्रकरणाची चौकशी न करता दुर्लक्ष करण्यात पालिका धन्यता मानताना दिसत आहे.
तज्ज्ञांचा अभाव
महापालिकेने लाखो रुपये खर्चुन सोनोग्राफी मशीनची खरेदी केली आहे. त्यानुसार मात्र त्याचा वापर होताना दिसत नाही. 2015-16 साली प्रति मशीन सरासरी 20 तर 2016-17 साली प्रति मशीन 30 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. महापालिकेकडे एकच क्ष-किरण तज्ज्ञ असल्याने या तपासण्यांचे प्रमाण कमी होते. असे असूनही 2016-17 साली महापालिकेने पाच मशीनची खरेदी केली.
आयुक्तांचे चौकशीचे आदेश
13 लाख रुपये किंमतीच्या 4 मशीन प्रत्येकी 23 लाख 85 हजार रुपयांना पालिकेने विकत घेतल्या. तर एक मशीन 32 लाख किंमतीत बाजारात मिळत असताना तब्बल 59 लाख 45 हजार रुपयांना घेण्यात आल्या. हे सगळे प्रकरण समोर आल्यावर महिनाभरापूर्वी आयुक्त कुणालकुमार यांनी अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांना या सर्व खरेदी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते.
दोषींवर कारवाईची मागणी
आदेश देऊन महिना उलटला तरी त्याबाबत काहीही हालचाल झालेली दिसत नाही. एकीकडे नको तिथे पैसे वाचवणारे प्रशासन 70 लाख रुपयांच्या चुराड्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करताना दिसत आहे. सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी यावर नाराजी व्यक्त केली असून या प्रकरणी चौकशी करून दोषींवर लवकरात लवकर कारवाईची मागणी केली.