नवी मुंबई । मनपाच्या ऐरोली येथील रुग्नालयातील सेवेचा बोर्या उडाला असतानाच आता सोनोग्राफीमध्ये बिघाड झाल्याने अनेक रुग्णांना चुकीचे रिपोर्ट येत असल्याने रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचा फटका गरोदर मातांना जास्त बसत असल्याने सोनोग्राफीच्या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी एका महिलेचे पती परशुराम उबाळे यांनी केले आहे. ऐरोली सेक्टर 3 येथे मनपाचे रुग्नालाय आहे. हे रुग्णालय जरी जनरल असले, तरी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गरोदर माता व बाल रुग्णाशिवाय येथे कोणत्याही रुग्णाला दाखल करून घेत नसल्याचे वास्तव आहे. या रुग्णालयातील सोनोग्राफीचा ठेका वेंडू डायग्नोस्टिकला दिला आहे. मनपाच्या रुग्णालयात गरोदर मातावर उपचार व बाळंतपण हे विनामूल्य होत असल्याने दिघा, ऐरोली, रबाले व घणसोली परिसरातील शेकडो महिला येथे उपचारासाठी येथे येत असतात.
ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णांचे नुकसान
घणसोली येथील संगीता उबाळे यांनासुद्धा उपचारासाठी याच रुग्णालयात सहा दिवसांपूर्वी आणले होते. गर्भाशयात अपेक्षित पाणी वाढावे म्हणून डॉक्टरांनी उपचार सुरू करून तीन वेळा सोनोग्राफी ही काढली. परंतु, उपचार करूनही अपेक्षित पाणी वाढल्याचे दिसून येत नाही. म्हणून डॉक्टरही चक्रावून गेले. पाणी वाढत नसेल तर बाळ दगाऊ नये म्हणून तत्काळ सीझरिन करणे गरजेचे असते. म्हणून संगीत उबाळे यांचे पती परशुराम उबाळे यांनी खासगी सेंटरमध्ये क्रॉस तपासणी करण्याचे ठरवले. म्हणून त्यांनी सेक्टर 4 येथील माया डायग्नोस्टिकमध्ये तपासणी केली. त्यामध्ये मात्र गर्भाशयात अपेक्षित असे पाणी आढळून आले. यावर मनपाने ज्या ठेकेदाराला ठेका दिला आहे त्यांची यंत्रणा चुकीचे रिपोर्ट देत असल्याचे आढळून आल्याने अशा ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी परशुराम उबाळे यांनी केली आहे.
सोनोग्राफीच्या जुन्या यंत्रामुळे आजतागायत अनेक रिपोर्ट चुकीचे येत असल्यामुळे त्याच्या त्रासाचा फटका स्त्रीरोग तज्ज्ञांना बसत असल्याचे आरोग्य सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे उपलब्ध असणार्या यंत्रणा बदलून नवीन यंत्रणा बसवावेत अशी मागणी अनेक रुग्ण करत आहेत. नाहीतर एखादाच्या जीवावर बेतू शकतो असे मत परशुराम उबाळे यांनी व्यक्त केले आहे. याबाबत ऐरोली रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. वर्षा राठोड यांना विचारले असता, आम्ही तशा अशायची नोटीस संबंधित ठेकेदाराला दिली असल्याचे म्हणाल्या.