मनोर । पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात बुधवार, 14 फेब्रुवारी, 2018 रोजी शैलेश सदाशिव सावे यांचे दुर्मिळ नाणी-नोटांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात सर्वप्रकारच्या कालखंडातील नाणी पाहावयास मिळणार आहेत. तसेच स्वातंत्र्यपूर्व काळापासून वेगवेगळया चलनी नोटांमध्ये व नाण्यांमध्ये कशाप्रकारचे बदल होत गेले आणि विविध चलनी नोटा व नाणी कशा चलनामध्ये येत गेल्या हे पहावयास मिळणार आहे. तारापूर येथे वास्तव्य करणार्या श्री. शैलेश सावे यांनी गेल्या दहा वर्षांपासून अथक परिश्रम घेऊन शेकडो प्रकारच्या दुर्मीळ नाणी-नोटांचा संग्रह केला आहे. नवीन पिढीला माहितीही नसेल अशाप्रकारची कित्येक नाणी व नोटा यांचा यामध्ये समावेश आहे.
या प्रदर्शनामध्ये मौर्य, सातवाहन, गुप्त, मुघल, मराठा या सर्व कालखंडातील तसेच विविध संस्थानिकांच्या राज्यांमधील नाणी, ब्रिटिशकालीन आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील नाणी इ. सर्व प्रकारची दुर्मीळ नाणी ठेवण्यात येणार आहेत. हे प्रदर्शन 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 10-30 ते संध्याकाळी 4-30 दरम्यान विद्यार्थ्यांबरोबरच सर्व नागरिकांसाठी खुले ठेवण्यात आले आहे. दुर्मीळ नाणी व नोटांमध्ये रुची असणार्या अभ्यासकांनी प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.