सोन्याच्या दरात 2600 रुपयांची ऐतिहासिक घसरण

0

2011 नंतर पहिल्यांदाच आठवडाभरात मोठ्या घसरणीची नोंद

जळगाव: कोरोना व्हायरसमुळे अनेक देशातल्या शेअर बाजारांमध्ये घसरण झाली आहे. कोरोना आणि मंदीच्या प्रभावाने आंतरराष्ट्रीय कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहे. सोन्याच्या भावात 2600 रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचा भाव 41,556.00 रुपयांवर आला आहे. तर चांदीच्या दरातही घसरण नोंदवली गेली आहे. कोरोनाचा प्रभाव सोन्याच्या भावावर सर्वाधिक पडला आहे. जळगावात शुक्रवारी सोन्याचा दर 42300 प्रतितोळा होता.

जळगावात 42300 प्रतितोळा

सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावात सोन्याचे दर दहा ग्रॅमसाठी 42300 रुपये होते. 46 हजारापर्यंत पोहोचलेल्या सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने खरेदीदारांचा कल खरेदीकडे वाढलेला दिसून आला. 22 कॅरेट सोन्याचे दर 42300 तर 24 कॅरेट सोन्याचे 44500 पर्यंत होते. चांदीचे दर मात्र स्थिर होते. चांदीचे दर एका किलोसाठी 45500 होते. लग्नसराई सुरु झाल्याने दागिने खरेदी आवश्यक झाली आहे. मात्र सोन्याचे दर गगनाला भिडल्याने सामन्यांना खरेदी न परवडण्यासारखी झाली होती. मात्र शुक्रवारी सोन्याच्या दरात घसरण झाल्याने खरेदीदारांनी खरेदीकडे आपला मोर्चा वळविला. गेल्या आठवड्याभरापेक्षा शुक्रवारी खरेदीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले.