सोन्यामध्ये नऊ हजार रुपयांची घसरण

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सोन्याच्या दरावर चांगलाच परिणाम झाल्याचं दिसून आलंय. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्यामध्ये गुंतवणूक कमी झाल्याने तसेच डॉलरचे बळकटीकरण झाल्याने सोन्याच्या किंमती तुलनेने कमीच राहिल्या आहेत. गेल्या वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यामध्ये आता जवळपास नऊ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय.
गेल्या दोन महिन्यांमध्ये सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पहायला मिळालं होतं. पण येत्या काळात सोन्याची किंमत वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे सध्या सोन्याच्या किंमती आवाक्यातील असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हाच योग्य काळ असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. सलग चार दिवस घसरणाऱ्या सोन्याच्या किंमतीला ब्रेक लागला असून सोन्याच्या किंमतीत आज 260 रुपयांची वाढ झाली आहे. मुंबई आणि पुण्यात आज 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव हा 48,300 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,300 रुपये इतका आहे. चांदीच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घसरण सुरु असून आज त्यामध्ये 300 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे आज एक किलो चांदीसाठी 67,500 रुपये मोजावे लागतील. गेल्या महिन्यात, 1 जून रोजी चांदीची किंमत ही 72,600 रुपये इतकी होती. त्यानंतर किंमतीत घट होऊन ती 70 हजारांच्या आत आली. 7 जुलै रोजी चांदीच्या किमतीने पुन्हा एकदा 70 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला. गेल्या आठवड्याचा विचार करता चांदीच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार होत असल्याचं दिसून आलं आहे.

नफावसुलीचा फटका

नफावसुलीने सोने आणि चांदीला मोठा फटका बसला आहे. जागतिक बाजारातील अनिश्चिततेचे पडसाद कमॉडिटी बाजारात उमटत आहेत. सोन्याचा भाव पुन्हा एकदा घसरला आहे.
Goodreturns या वेबसाईटनुसार आज बुधवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७३१० इतका खाली आला आहे तर २४ कॅरेटचा भाव ४८३१० रुपये इतका आहे. चांदीला देखील नफावसुलीचा फटका बसला आहे. काल चांदीमध्ये ६४९ रुपयांची घसरण झाली. एक किलो चांदीचा भाव ६६५९७ रुपयांवर स्थिरावला. तो ६६२८६ रुपयांपर्यंत खाली आला होता.