भुसावळ। महाराष्ट्रासह खान्देशात आखाजी या सणाला अनन्य साधारण महत्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीया सणानिमीत्ताने सराफ बाजार आणि वाहन बाजाराला नवी झळाली मिळाली आहे. त्यामुळे सराफा व्यावसायिकांना नोटबंदीनंतर प्रथमच अच्छे दिन आले असल्याचे दिसून आलेे. अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे किंवा सोन्याचे दागिने भेट म्हणून दिल्यास ते अक्षय्य म्हणजेच कधीही संपत नाहीत, अशी कल्पना आहे. शिवाय या दिवशी कोणताही मुहूर्त पहावा लागत नाही. त्यामुळे किरकोळ खरेदी करणारे ग्राहक थेट सराफा दुकानात येऊन दागिने खरेदी करतात. लग्नसराईचे दिवस असल्याने ग्राहकांनी बुकींग केलेले दागिणे आज खरेदी केले. तर काहींनी वाहन खरेदीला प्राधान्य दिले. त्यामुळे बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल झाली असल्याचे समजते.
सुवर्ण बाजार तेजीत
बँकेत विशिष्ट मर्यादेच्यावर रक्कम असल्याचे तसेच बँकेतून रक्कम काढल्यास कर लागत असल्यामुळे या भितीपोटी ग्राहक आता बँकांमध्ये पैसे जमा करण्यास टाळत आहे. ग्राहक आपला हा पैसे बँकेत गुंतवणूक न करता सोने खरेदी करुन गुंतविण्यावर भर देत आहेत. याचा परिणाम सोने बाजार सध्या तेजीत असल्याचे दिसून येत आहे.
लग्नसराईचाही जाणवला परिणाम
अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून करण्यात येणार्या सोने खरेदीमुळे शुक्रवारी सुवर्ण बाजारात आर्थिक तेजी जाणवली. लग्नसराईचा मोसम सुरू होण्याआधीचा सण असल्यामुळे सोने खरेदीचा अक्षय आनंद लुटला. साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त असे अक्षय तृतीयेचे महत्त्व आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीला नागरिक प्राधान्य देतात. अक्षय तृतीयेपासून शुभ कार्याचे मुहूर्त सुरु होतात. त्यामुळे लग्नसराईचा मोसम सुरू होण्याआधीचा सण असल्याने सोने खरेदीला अक्षय ऊर्जा मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सोने बाजारात दिवसभर लगबग दिसून आली.
वाहन खरेदीला ही मिळाला प्रतिसाद
अक्षय तृतीयेच्या या मुहूर्तावर ग्राहकांनी वाहन खरेदीलाही विशेष प्राधान्य दिले असल्यामुळे शहरातील वाहन शोरुममध्ये आज दिवसभर गर्दी पहावयास मिळाली. शहरातील वाहन बाजारात दिवसभरात दीडशेच्यावर वाहनांची विक्री झाली. काहींनी तर दोन दिवसांपासूनच वाहनांची बुकींग केली होती. आज शुभ दिवस असल्यामुळे सकाळपासून ग्राहकांनी आपापली वाहने घरी घेऊन गेले.
डिजीटल पेमेंटकडे दुर्लक्ष
सराफ बाजारात महिलांनी सोने खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. शहरातील अनेक नामांकित सोने चांदीच्या दुकानांत शहरासह परिसरातील महिलांनी दागिन्यांची खरेदी केली. महिलांच्या गर्दीने शहरातील सराफ बाजार चांगलाच फुललेला दिसला. महिलांनी यावेळी सोन्याच्या दागिने खरेदीला अधिक पसंती दिल्याने सराफ बाजारात लाखोंची उलाढाल झाली. नोटाबंदीनंतर चलन तुटवडा निर्माण झाल्यानंतरही ग्राहकांचा डिजिटल पेमेंटकडे कल वाढलेला दिसून येत नाही. शासन कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे. विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. तरी देखील यास प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. काही ग्राहक स्वाईप कार्डद्वारे तसेच चेकद्वारे पेमेंट करीत आहेत. तर बहुतांश ग्राहक रोखीनेच व्यवहार करीत असल्याचे दिसून आले अक्षय तृतीयेनिमित्त शहरातील जामनेर रोडवरील मुख्य बाजारपेठ पुर्णपणे सजली होती. तसेच अक्षय्य तृतीया हा महत्त्वाच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. त्यानुसार सर्वांनी घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून पितरांचे पूजन केले.