सोपराज्याच्या साथीदारालाही पुणे येथून अटक

0

जळगाव। अट्टल घरफोड्या सोपराजा उर्फ राजेंद्र दत्तात्रेय गुरव (वय 28, रा. आसोदा रोड) याला रामानंदनगर पोलिसांनी 29 एप्रिल रोजी अटक केली होती. सोमवारी रात्री त्याच्या साथीदाराला रामानंदनगर पोलिसांच्या पथकाने पुणे येथून अटक केली आहे. त्याला मंगळवारी न्यायाधीश ए.व्ही.कस्तुरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 25 मे पर्यंत कोठडी सुनावली आहे.

अट्टल घरफोड्या सोपराजा उर्फ राजेंद्र गुरव याला रामानंदनगर पोलिसांनी 29 एप्रिल रोजी अटक केली होती. त्यावेळी त्याच्या सोबत अजय हिरालाल पाटील (वय 26, रा. मेहरूण) हा सुद्धा होता. मात्र पोलिसांच्या हातून तो त्यावेळी निसटला होता. सोपराजाने पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याच्या अजय पाटील आणि आणखी एका साथीदारांच्या सहायाने शहरात पाच घरफोड्या आणि 6 दुचाकी चोरल्याची कबुली दिली होती. त्याचे दोन्ही साथीदार पोलिसांना सापडत नव्हते. रामानंदनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण वाडीले यांनी पोलिस उप निरीक्षक राजेश घोळवे, गोपाल चौधरी, प्रदीप चौधरी, ज्ञानेश्वर कोळी, अतुल पवार यांच्या पथकला अजय पाटील या अट्टल घरफोड्याला शोधण्यासाठी पाठविले होते. रामानंदनगर पोलिसांच्या हातून निसटलेला अजय पाटील हा पुण्यात असल्याची माहिती प्रदीप चौधरी यांना मिळाली होती. त्यावरून रामानंदनगर पोलिसांचे पथक त्याला अटक करण्यासाठी पुणे येथे गेले होते. त्यावेळी पुणे येथील खर्डी रस्त्यावरील आम्रपाली हॉटेलवर काम करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून त्यांनी आम्रपाली हॉटेल येथे वेश बदलून तपास केला. त्यावेळी अजय पाटील नावाचा कोणीच कर्मचारी नसल्याचे त्यांना सांगितले. मात्र पोलिसांना अजय हॉटेलमध्ये कामकरताना दिसला. त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने शाहरूख खान असल्याचे सांगितले. हॉटेल मालकाला विचारले असता त्यानेही त्याचे नाव शाहरूख असल्याचे सांगून 2 मे रोजी कामाला आल्याची माहिती त्याने दिली. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने सोपराजाचा साथीदार असल्याची कबुली दिली.

नाशिकलाही होते वास्तव्य…
रामानंदनगर पोलिसांनी नाशिक येथील अट्टल चोर राहूल सोनवणे याला अटक केली होती. सर्व चोरट्यांनी राहण्याची सोय राहूल नाशिक येथे करीत होता. त्यात सोपराजा सोबत अजय सुद्धा राहत होता. त्यांनी नाशिक येथील इंदिरानगरात केलेल्या घरफोडीतही त्याचा सहभाग असल्याची कबुली पोलिसांच्या चौकशीत दिली आहे. तसेच जळगावात सोपराजा सोबत पाच घरफोड्या केल्याची कबुलीही त्याने दिली आहे. तसेच अजयवर एमआयडीसी तसेच जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.