सोमय्यांच्या एण्ट्रीने गुंतवणूकदारांच्या जीवात जीव!

0

पुणे : डीएसके ग्रूपने त्यांच्या कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधीची (इपीएफ) रक्कम कपात केली खरी, परंतु नोव्हेंबरपासून ती भरली नाही. हा गंभीर प्रकार असून, त्याप्रकरणी पोलिसांत एफआयआर दाखल व्हावा, अशी मागणी भाजपचे नेते तथा खा. किरीट सोमय्या यांनी एका इंग्रजी दैनिकाशी बोलताना केली. डीएसकेंकडे कर्मचारी, गुंतवणूकदार यांचे पैसे अडकले असून, तब्बल 1200 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सेक्युरिटी अ‍ॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)ने आणि इतर संस्थांनी ताबडतोड चौकशी सुरु करावी, अशी मागणीही खा. सोमय्या यांनी केली आहे. दरम्यान, गुंतवलेले पैसे परत मिळण्यासाठी गुंतवणूकदारांनी पोलिस व न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असून, पैसे परत करण्याची मागणी केली आहे. खा. सोमय्या यांनी यापूर्वी आदर्श सोसायटी घोटाळा, मॅपल ग्रूपचा घोटाळा, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा घोटाळा बाहेर काढला होता. याप्रकरणी नंतर कारवाई होऊन संबंधितांना कारागृहाची हवा खावी लागली होती. आता डीएसकेप्रकरणात खा. सोमय्या यांनी लक्ष घातल्याने गुंतवणूकदार व कर्मचारीवर्गाच्या पैसे परत मिळण्याबाबत आशा पल्लवीत झाल्या आहेत.

सेबी, अर्थमंत्रालयाने तातडीने चौकशी हाती घ्यावी!
याबाबत पुणे मिरर या इंग्रजी दैनिकाशी बोलताना खा. किरीट सोमय्या म्हणाले, की कुलकर्णी व त्यांच्या उद्योग समूहाने त्यांचे कर्मचारी व गुंतवणूकदार यांना पैसे दिलेले नाहीत. मला इपीएफ कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुलकर्णी यांनी कर्मचार्‍यांचा इपीएफ त्यांच्या वेतनातून कापला खरा, परंतु तो नोव्हेंबरपासून पीएफ कार्यालयाकडे भरलेला नाही. हा गंभीर प्रकार असून, स्वतंत्र प्रकरण आहे. या शिवाय, कुलकर्णी यांनी कर्मचार्‍यांना पगारही दिलेला नाही. याबाबत आपण, कामगार आयुक्तांकडेही तक्रार दाखल केली असून, त्यांना तातडीने याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. हा जवळपास 1200 कोटींचा घोटाळा आहे, हे काही छोटे प्रकरण नाही. याप्रकरणात पीएफ जमा न केल्याबद्दल तातडीने एफआयआर दाखल व्हायला हवा. तसेच, आणखी काही कागदपत्रे आपण मागवली आहेत. याशिवाय, सेबी व अर्थ मंत्रालयानेही या गंभीर घोटाळ्याची स्वतंत्र चौकशी तातडीने हाती घ्यायला हवी, अशी मागणीही खा. सोमय्या यांनी केली आहे. पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनीही याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे. हा सर्वसामान्य माणसांच्या पैशाचा मुद्दा असल्याने मुख्यमंत्र्यांनी तातडीने चौकशी हाती घ्यावी, अशी मागणीही कुंभार यांनी केली.

व्याज नसले तरी चालेल, मूळ रक्कम परत मिळावी!
दरम्यान, डीएसके प्रकरणात भाजप नेते खा. किरीट सोमय्या यांनी लक्ष घातल्यानंतर पैसे अडकलेल्या गुंतवणूकदारांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. याबाबत नाव उघड न करण्याच्या अटीवर एका गुंतवणूकदाराने सांगितले, की सोमय्यांनी आमचे पैसे परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याने पैसे मिळण्याबाबत आता आशा निर्माण झाली आहे. हे प्रकरण आता मुख्यमंत्रिस्तरावर पोहोचल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. तरीही गुंतवलेली पुंजी जोपर्यंत हातात मिळत नाही, तोपर्यंत काही शाश्वती वाटत नाही. 12 टक्के व्याजापोटी गुंतवणूक केली होती. परंतु, आता व्याज नाही मिळाले तरी चालेल, परंतु मूळ रक्कम तरी परत मिळावी, अशी विनंतीही गुंतवणूकदाराने केली. दरम्यान, या संदर्भात डी. एस. कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.

डीएसके उद्योग समूहाची आर्थिक हालत खास्ता!
डीएसके उद्योग समूह हा पुण्यातील सर्वात मोठा उद्योग समूह आहे. त्यातील डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स ही महत्वाची कंपनी आहे. या समूहातर्फे शिक्षण, सेवा, ऊर्जा, ऑटोमोबाईल डिलरशीप यासह स्वतःची फूटबॉल टीम आदी उद्योग-व्यवसाय चालविले जातात. मार्च महिन्यात धनादेश अनादरबाबत डीएसकेच्या एका बैठकीतील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डीएसके अडचणीत यायला सुरुवात झाली होती. गेल्या 35 वर्षांपासून हा उद्योग समूह दीर्घ मुदतीच्या ठेवी (फिक्स डिपॉझिट स्कीम) स्वीकारत असून, त्या योजनेतील गुंतवणूकदारांना गतवर्षापर्यंत नियमित व्याज मिळत होते. परंतु, गतवर्षीपासून हे व्याज मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपली मूळ रक्कम परत मागण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी गुंतवणूकदारांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, न्यायालयात धाव घेण्याचीही तयारी चालवली आहे. याप्रकरणात भाजपचे खा. किरीट सोमय्या यांनीही लक्ष घातले असून, मुख्यमंत्री, अर्थ मंत्रालय यांच्यासह पीएफच्या सहआयुक्तांकडेही तक्रार दाखल केली आहे. हा सुमारे 1200 कोटींचा घोटाळा असल्याचा आरोपही खा. सोमय्या यांनी केला आहे.