मुंबई (संजय घावरे)। 18 मे 2014 रोजी झी मराठी वाहिनीच्या पटलावर भगवान खंडोबची महती वर्णन करणार्या ‘जय मल्हार’ या मालिकेचा उदय झाला. अल्पावधीतच या मालिकेने लोकप्रियतेचा कळस गाठला. या मालिकेत खंडेरायांची भूमिका साकारणार्या देवदत्त नागेच्या रूपात आजच्या पिढीसमोर भगवान खंडोबाचा नवा चेहरा आला. जवळजवळ तीन वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी ‘जय मल्हार’ ही मालिका सोमवार 30 एप्रिलपासून प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. त्यामुळे सोमवारनंतर खंडेराया म्हणजेच देवदत्त नागे काय करणार? हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना सतावतो आहे.
ऐतिहासिक किंवा पौराणिक मालिकांमधल्या गाजलेल्या व्यक्तिरेखांकडे आणि त्या अनुषंगाने ती व्यक्तिरेखा साकारणार्या कलाकाराकडे प्रेक्षक नेहमी त्याच नजरेतून पाहत आले आहेत. त्यामुळे देवी देवतांच्या किंवा संतांच्या भूमिकांमध्ये लोकप्रिय झाल्यानंतर त्या कलाकारांचा अन्य व्यक्तिरेखांमध्ये स्वीकार केला जात नसल्याची साक्ष इतिहास देतो. ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची ‘शिर्डी के साईबाबा’मधली संत श्री साईबाबांची भूमिका इतकी सजीव वाटली की आजही कित्येक लोक त्यांना साईबाबा म्हणूनच ओळखतात. ‘रामायण’ या मालिकेत अरुण गोविल यांनी साकारलेली भगवान श्रीरामाची व्यक्तिरेखाही खूप लोकप्रिय झाली. गोविल यांच्यासोबत दिपीकाने साकारलेली सीतादेखील प्रेक्षकांना भावली. ‘महाभारत’मध्ये नितीश भारद्वाजने साकारलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या खोड्यांनी प्रेक्षकांना वेड लावले. याच मालिकेत द्रौपदीच्या भूमिकेतील रुपा गांगुलीनेही खूप लोकप्रियता मिळवली, पण या सर्व कलाकारांना या व्यक्तिरेखांचे वलय भेदण्यात कधीच यश आले नाही. त्यामुळे ते इतर कोणत्याही व्यक्तिरेखांमध्ये लोकप्रिय होऊ शकले नाहीत. याला काही कलाकार अपवाद आहेत. मुकेश खन्ना यांनी ‘महाभारत’मध्ये साकारलेले पितामह भीष्म खूप लोकप्रिय झाले, पण ‘शक्तीमान’च्या माध्यमातून खन्ना यांनी भीष्माचे चक्रव्यूह भेदले. स्वप्निल जोशीने ‘महाभारत’ या मालिकेत बाळकृष्णाच्या लीळा दाखवल्या होत्या, पण तो देखील त्या इमेजमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाला. पूर्वीच्या काळी गाजलेल्या मालिकांमध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची ‘चिमणराव गुंड्याभाऊ’ ही मालिका खूप गाजली.
या मालिकेतील प्रभावळकरांची चिमणराव ही व्यक्तिरेखा अजरामर झाली, पण त्यांनीही पुढे आपली नवी इमेज निर्माण करत ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटात साकारलेले महात्मा गांधी संपूर्ण जगभर गाजले. इतकेच नव्हे तर ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यात सूर्यकांत मांढरे यांनी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज आजही लोकप्रिय आहेत, पण ते त्या भूमिकेत अडकून राहिले नाहीत. त्यामुळे खंडेरायाच्या भूमिकेत यशस्वी ठरलेला देवदत्त या मालिकेनंतर काय करणार? ते पाहायचे आहे.
देवदत्तबाबत सांगायचे तर त्याला सध्या थोडा वेळ आपल्या कुटुंबियांसाठीही द्यायचा आहे. या मालिकेसाठी सेटवर वेळेत पोहोचण्यासाठी करावी लागणारी धावपळ कमी झाली असली तरी आता पुन्हा खंडेरायांची भूमिका साकारण्याची संधी मिळणार नसल्याचे दु:ख त्याला कायम सतावणार आहे. खंडेरायांची व्यक्तिरेखा जरी रसिकांनी डोक्यावर घेतली असली, तरी भविष्यात आणखी खूप वेगवेगळ्या भूमिका साकारण्याची देवदत्तची इच्छा आहे. 30 एप्रिल रोजी ‘जय मल्हार’चा 950 वा म्हणजेच शेवटचा भाग प्रसारीत होणार आहे. या मालिकेची जागा ‘लागी रं झालं जी’ ही नव्या दमाची मालिका घेणार आहे.