स्वारगेट । एसटीच्या वतीने स्वारगेट ते कोल्हापूर मार्गावर सोमवारपासून (दि. 28) शिवशाही बस सोडण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने घेतला आहे. ही शिवशाही बस संपूर्णपणे वातानुकूलित असून, अत्यंत आरामदायी आहे. शिवशाहीचे तिकीट दर तुलनेने कमी ठेवण्यात आल्याचे एसटीच्या वतीने सांगण्यात आले. स्वारगेटहून कोल्हापूरकरीता ही बस सकाळी 5, 6, 11, दुपारी 12, सायंकाळी 5, 6, रात्री 10.30 व 11.30 वाजता सोडण्यात येणार आहे.
या बसमध्ये पुशबॅक सीट, 2 एलईडी स्क्रीन, मोबाईल चार्जर अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम, फायर डिटेक्शन सस्पेन्शन सिस्टिम अशी सुरक्षा उपकरणे बसविण्यात आली आहेत. शिवशाही बसचे अगाऊ आरक्षण सुरू करण्यात आले असून, सर्व एसटी आगारात प्रवासी त्यांचे तिकीट आरक्षित करू शकतात. त्याचप्रमाणे एमएसआरटीसी मोबाईल अॅप व एसटीच्या मान्यताप्राप्त खासगी एजंटमार्फत संगणकीय आरक्षणाद्वारेदेखील तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. जास्तीत जास्त प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटीच्या वतीने करण्यात आले आहे.