मुंबई : मागील सर्व निवडणुकांमध्ये झालेली घसरण रोखायची कशी? भाजपचे आव्हान आणि पक्ष मजबूतीसाठी कोणते उपाय योजता येतील यावर उपाययोजना करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये आजपासून दोन दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत विचारमंथन करणार आहे. या बैठकीला आजी-माजी खासदार-आमदार, माजी मंत्री, शहर व जिल्हाध्यक्ष शेकडो नेत्यांना बैठकीकरिता निमंत्रित करण्यात आले आहे.
आंदोलनाची रूपरेषा ठरणार
आगामी निवडणुकांसाठी पक्षाने पुन्हा उभारी घेणे गरजेचे असल्याने पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये पक्षाच्या निवडक नेत्यांचे विचारमंथन होणार आहे. पक्षाचे आजी-माजी खासदार-आमदार, माजी मंत्री, शहर व जिल्हाध्यक्ष शेकडो नेत्यांना बैठकीकरिता निमंत्रित करण्यात आले आहे. पुढील वर्षभरातील कार्यक्रम तसेच आगामी तीन महिन्यांमध्ये हाती घ्यायची आंदोलने याची रूपरेषा निश्चित केली जाईल, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.
पक्ष बळकटीचे प्रयत्न
नुकत्याच झालेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिकांमध्येही पक्षाला मर्यादितच यश मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस चौथ्या क्रमांकावर गेला आहे. पश्चिम महाराष्ट्र या पक्षाच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात भाजपने मुसंडी मारली. सहकार चळवळीतही भाजपने शिरकाव केला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड या बालेकिल्ल्यातील महानगरपालिकाही भाजपने हिसकावून घेतल्या आहेत. परभणी महानगरपालिकेची सत्ताही राष्ट्रवादीच्या हातातून गेली. मीरा-भाईंदरमध्ये पक्षाचा अस्त झाला. जिल्हा परिषदांमध्येही राष्ट्रवादीची पिछेहाट झाली आहे. मागील तीन वर्षांत राष्ट्रवादीचा आलेख चांगलाच घसरला आहे. यापार्श्वभूमीवर पक्षाला आगामी निवडणुकांसाठी बळकट करण्यासाठी हे राष्ट्रवादी विचारमंथन करणार आहे.