पिंपरी-चिंचवड : महान गणेशभक्त श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी यांचा 456 वा संजीवन समाधी महोत्सव 27 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीत होत आहे. यानिमित्त पिंपरी-चिंचवडकरांना विविध अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. प्रसिद्ध गायिका राधा मंगेशकर, जितेंद्र अभ्यंकर, आनंद भाटे, तालवादक तौफिक कुरेशी हे आकर्षण असणार आहेत. सांगली येथील शिवभक्त संभाजी भिडे गुरुजी यांना करवीर पीठाचे जगदगुरु शंकराचार्य विद्याशंकर भारती यांच्या हस्ते ‘श्री मोरया जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार जगन्नाथ देव महाराज यांनी याबाबत पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. यावेळी विश्वस्त विश्राम देव, आनंद तांबे, अॅड. राजेंद्र उमाप, विनोद पवार, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे आदी उपस्थित होते.
देऊळमळा येथे सर्व कार्यक्रम
चिंचवड येथे श्री मोरया गोसावी समाधी मंदिर पटांगणावर (देऊळमळा) सोमवारी सायंकाळी पाच वाजता परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन होणार आहे. सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रम, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिर, प्रवचन, भजन व मराठी सुगम संगीताच्या कार्यक्रम होतील. राधा मंगेशकर, जितेंद्र अभ्यंकर, आनंद भाटे या गायकांसह तालवादक तौफिक कुरेशी यांचे कार्यक्रम होणार आहेत. बुधवारी सकाळी साडेसातला सामुहिक अथर्वशीर्ष पठण आणि सोमवारपासून 3 डिसेंबरपर्यंत सायंकाळी पाच ते सात या वेळात ह.भ.प. चारुदत्त आफळे बुवा यांची ’दत्त संप्रदाय व गुरुशिष्य परंपरा’ यावर प्रवचने होणार आहेत.
विविध आरोग्य शिबिरे
5 डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता मोरया गोसावी यांच्या समाधीची महापूजा चंद्रशेखर रबडे गुरुजी यांच्या हस्ते, दुपारी दोन वाजता आरोग्य व दंत चिकित्सा व मोफत औषधे वाटप, आणि रात्री साडेआठ वाजता जितेंद्र अभ्यंकर व राधा मंगेशकर यांचा ‘मोगरा फुलला’ हा संगीत कार्यक्रम होईल. 6 डिसेंबरला सकाळी सात वाजता सामुदायिक अथर्वशीर्ष पठण, सकाळी साडेनऊ पासून रक्तदान शिबीर आणि रात्री आठ वाजता आनंद भाटे यांचा ‘आनंदरंग’ हा कार्यक्रम होईल.
भिडे गुरूजींना जीवन गौरव पुरस्कार
7 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता संभाजी भिडे गुरुजी यांचे ‘भगवान श्री छत्रपती आणि आपण’ या विषयावर व्याख्यान होईल. त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. रात्री साडेआठ वाजता तालवादक तौफिक कुरेशी यांचे जेंबे वादन व तन्मय देवचक्के यांचे हार्मोनियम वादन होणार आहे. 8 डिसेंबर रोजी मोरया गोसावी यांच्या समाधी दिवशी पहाटे साडेचार वाजता मंदार महाराज देव व चिंचवड ब्रह्मवृंद यांच्या हस्ते समाधीची महापूजा व अभिषेक करून सकाळी सात वाजता भव्य दिंडी व श्री मोरया गोसावी समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. त्यानंतर साडेआठ ते 10.30 या वेळात ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. काल्याच्या कीर्तनानंतर सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. धनधान्य संकलनाची व्यवस्था श्री मोरया यात्री निवास व श्री मंगलमूर्ती वाडा, चिंचवड येथे करण्यात आली आहे. दरम्यान, विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप यांनी महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी महाप्रसादासाठी पाच लाख रुपयांचा धनादेश ट्रस्टला दिला.