शिंदखेडा । शिंदखेडा शहर व तालूक्यात खांन्देशचे दैवत असलेल्या कानुबाई मातेच्या उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. जुलै महिन्यात जोरदार पावसाची अपेक्षा होती;परंतू घोर निराशा झाली.या महिन्याच्या अखेरच्या दोन दिवसात समाधानकारक पाऊस झाल्याने कानुबाई मातेच्या उत्सवासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. अद्यापही नदी नाले कोरडे आहेत.त्यामुळे जोरदार पावसाची प्रतिक्षा कायम असतांना पिकांच्या वाढीसाठी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी वर्गासह नागरीकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. गावा गावामध्ये कानुबाई मातेचा उत्सव साजरा करण्यासाठी धावपळ सुरू आहे. दूरदेशी असलेले आप्तेष्ट बाळगोपाळांसह आपल्या मूळगावी असलेल्या घराकडे धाव घेत आहेत.
रोट करण्याची प्रथा
पुरणपोळीचा नैवद्य देवीला दाखविण्यात येतो.त्यानंतरच कुटुंबातील व्यक्तिंना हा गोडधोड स्वयंपाक खाता येतो.गावातील ग्रामस्थ आपल्या कुटूंबासमवेत कानबाई मातेचे दर्शन भक्तिभावाने घेतात. गावामध्ये मातेची प्राणप्रतिष्ठा ज्या-ज्या ठिकाणी झाली आहे; त्याप्रत्येक ठिकाणी जावून भाविक मातेचे भक्तिभावाने दर्शन घेत असतात. श्रावणाच्या दुस-या सोमवारी सकाळी ढोलताशांच्या गजरात विर्सजन मिरवणूक काढण्यात येते.गावालगत असलेल्या नदीच्या पाण्यात देविचे विर्सजन करण्यात येते. पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्याने नदीनाले कोरडे आहेत.त्यामुळे गावविहिरीवर जावून विर्सजन करण्यात येते. खान्देशात कानबाई मातेचा उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात येतो. कानबाईमातेची स्थापना करण्याचा नवस केलेला असल्यास पाहूणी कानबाई आणून प्राणप्रतिष्ठा करून नवस फेडला जातो. ज्यांच्याकडे कानुबाईमाता आहे,त्यांना विनंती करून वाजत गाजत मातेला ज्या पाहूण्याघरी प्राणप्रतिष्ठा करावयाची आहे त्याघरी आणले जाते. यानंतर मातेची विधिवत स्थापना केली जाते.
भजनी मंडळाद्वारे जागर
श्रावण वद्य अष्टमीला कानुमातेची स्थापना करण्यात येते. यंदा आज रविवारी कानुमातेची स्थापना होत आहे. आप्तेष्ट व नातेवाईक यांच्या उपस्थितीत मातेची विधीवत पूजा करून प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात येते.उत्सवानिमीत्त जागरण केले जाते.रात्रभर मातेचा गोडवा गाणारी गाणी म्हटली जातात.काही ठिकाणी भजनी मंडळाला आमंत्रित केले जाते.देवीसमोर महिला नाचगाणे म्हणतात. रोट करण्याची प्रथा खान्देशात आहे.