सोमवारी दिल्लीत राणे-शहा भेट

0

मुंबई : सोमवारी दिल्लीत भाजपच्या कार्यकारिणीची बैठक संपल्यानंतर काँग्रेसमधून बाहेर पडलेले नेते नारायण राणे हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेणार आहेत. नारायण राणे हे अमित शाह यांना सिंधुदुर्गातील रुग्णालयाच्या उद्घाटनाचे निमंत्रण देणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

भाजप प्रवेशाच्या चर्चेला बळ
अमित शाह आणि नारायण राणे यांच्या भेटीने आता त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना बळ मिळाले आहे. नारायण राणे यांनी विधानपरिषद आमदारकीचा आणि काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. कुडाळमधील पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली होती. काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचे आश्‍वासन दिले मात्र कधीच पाळले नाही. 26 जुलै 2005 रोजी मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण या 12 वर्षात माझ्या कामाचा, अनुभवाचा फायदा करुन घेतला नाही, असा आरोपही राणेंनी केला होता. नारायण राणे यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. राणे नवीन पक्षाची स्थापना करतील किंवा भाजपमध्ये जातील, अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे.