सोमवार पर्यंत जिल्हात पाऊस सुरूच राहणार

जळगाव – गोवा किनारपट्टीपर्यंत अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने शुक्रवार, शनिवार आणि रविवारी जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने वर्तविले आहे. सोमवार पर्यंत वातावरण असेच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

या आठवड्यापासून राज्यात विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारी जिल्ह्यात काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. गुरुवारी जळगाव शहरात रिमझिम पाऊस झाला. दिवसभर वातावरण ढगाळ झाल्याने किमान तापमानदेखील १४ अंशांवरून २० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे हवेतील गारठादेखील कमी झाला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार शुक्रवार, शनिवार आणि रविवारी जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. सोमवारपासून वातावरण निरभ्र होईल, असा अंदाज वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. त्यात वाऱ्याचा वेगही ताशी १२ किलोमीटरपर्यंत वाढू शकतो, असे हवामान विभागाने नमूद केले आहे..