सोमाटणेत वीज बिल भरणा केंद्र उभारा

0

शिरगाव : पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सोमाटणे येथील शाखेत वीज बिल भरणा केंद्र सुरू करण्यात यावे. त्यामुळे वीज बिल भरण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध होईल, अशी मागणी संत तुकाराम साखर कारखान्याचे माजी संचालक राजाराम राक्षे यांनी केली आहे. जर ही सुविधा सुरू झाली तर शिरगाव, साळुंब्रे, दारुंब्रे, सांगवडे, सोमाटणे, गहुंजे, कासारसाई आदी गावांतील वीज ग्राहकांची गैरसोय दूर होणार आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनी व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सोमाटणे शाखेने या मागणीचा विचार करावा, असेही राक्षे यांनी म्हटले आहे.

हजारोंच्या संख्येने वीज ग्राहक
शिरगाव, साळुंब्रे, दारुंब्रे, सांगवडे, सोमाटणे, गहुंजे, कासारसाई आदी गावांमध्ये हजारोंच्या संख्येने वीज ग्राहक आहेत. दर महिन्याला या ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी बेबडओहोळ येथे जावे लागते. काही कामानिमित्त वीज बिल भरण्यास उशीर झाला तर वीज कंपनीकडून त्वरित वीज कनेक्शन कापले जाते. तर काही वेळेत दंडाची रक्कम भरावी लागते. सोमाटणे येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत वीज बिल भरणा केंद्र सुरू केले तर या परिसरात असलेल्या गावांमधील वीज ग्राहकांना वीज बिल भरणे सोयीचे होणार आहे.

दोन महिन्यांपासून सुविधा बंद
मागील काही महिन्यापूर्वी एका पतसंस्थेत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु, काही कारणास्तव दोन महिन्यापासून ही सुविधा बंद झाली आहे. त्यामुळे या सर्व ग्राहकांची मोठी अडचण होत आहे. सोमाटणे येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेने 2014 साली ही सुविधा मिळावी, म्हणून तसा प्रस्ताव वीज वितरण कंपनीकडे पाठविण्यात आला होता. परंतु, अद्यापही त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आता पुन्हा वीज बिल भरणा केंद्राची मागणी करणारा प्रस्ताव राजाराम राक्षे, यशवंत बोडके, धनंजय विधाटे, आत्माराम वाघोले, संभाजी राक्षे, सुनील राक्षे, हिरामण बोडके, राकेश मुर्‍हे यांच्या वतीने महावितरण कंपनीकडे पाठविण्यात आला आहे.