शिरगाव : सोमाटणे येथील विठ्ठलवाडी जिल्हा परिषद शाळेत जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सोमाटणेच्या सरपंच नलिनी गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सरपंच मंगल मुर्हे, आढळे केंद्राच्या पर्यवेक्षिका शुभांगी जोशी, अंगणवाडी सेविका मंगल पडवळ, मदतनीस शैला जगदाळे, मुख्याध्यापक देवीप्रसाद तावरे यांच्यासह प्राथमिक शाळेतील शिक्षिका, आशासेविका व ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.
स्तनपानाचे महत्त्व सांगितले
या कार्यक्रमात आढळे केंद्राच्या पर्यवेक्षिका शुभांगी जोशी यांनी, स्तनपानाचे बाळाच्या जीवनातील महत्त्व नवमातांना समजावून सांगितले. त्याचप्रमाणे नवमातेचा आहार कसा असावा, स्तनपानाचा मातेला व बाळाच्या आरोग्याला होणारा फायदा, स्तनपान करीत असताना मातेची बसण्याची स्थिती कशी असावी, बाळाला कसे पाजावे, याबाबतदेखील जोशी यांनी सविस्तर माहिती सांगितली.
बाळासाठी स्तनपान महत्त्वाचे
पुढे बोलताना शुभांगी जोशी म्हणाल्या की, जन्मानंतर किमान सहा महिने बाळाला स्तनपान करणे अनिवार्य आहे. त्यानंतर स्तनपानाबरोबर बाळाला वरचा सकस आहार द्यावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी कोठेवार यांनी बाळाच्या लसीकरणाचे वेळापत्रक कसे असावे व कोणत्या लसीमुळे कोणत्या रोगापासून संरक्षण मिळते, याची सविस्तर माहिती सांगितली. सोमाटणे येथील अंगणवाडी सेविका मंगल पडवळ यांनी गरोदर, स्तनदा माता यांचा आहार, सहा महिन्यानंतर बाळाला द्यावयाचा आहार, याबाबत गरोदर व नवमातांना माहिती दिली.