सोम्या-गोम्या कामे अडवितातच कशी? : सावळे

0

बांधकाम, उद्यान, आकाशचिन्ह विभागाला घेतले फैलावर

पिंपरी-चिंचवड : स्थायी समितीत ठराव मंजूर झाला की ठेकेदार, पुरवठादाराला वर्क ऑर्डर दिलीच पाहिजे. सोम्या-गोम्या उठतो आणि वर्क ऑर्डर द्यायची नाही, असे सांगतो. आयुक्तही त्यांचे ऐकतात आणि कामाला सुरुवात करत नाहीत, असा आरोप स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी केला. या विदारक परिस्थितीत अडथळ्यांची शर्यत कशी पार पाडायची, लोकांना काय उत्तरे द्यायची असा संतापही त्यांनी व्यक्त केला. अंदाधुंद कारभार कसा सहन करायचा, असा संतप्त सवाल सीमा मावळे यांनी केला. सभा तब्बल अडीच तास चालली. आयुक्त, शहर अभियंता, उद्यान अधीक्षक, सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांना सावळे यांनी चांगलेच फैलावर घेतले.

रस्ते विकासाची कामे रखडली
पत्रकारांना माहिती देताना सावळे म्हणाल्या, वृक्ष प्राधिकरण समितीच्या दोन सदस्यांची एक समिती नियुक्त केली आहे. हे दोन सदस्य जाऊन विकासकामांना अडथळा ठरणार्‍या झाडांची पाहणी करणार आणि त्यानंतर वर्क ऑर्डर द्यायची की नाही याचा निर्णय घेतला जातो. या कार्यपद्धतीमुळे रस्ते विकासाची 450 कोटींची कामे रखडली आहेत. मेट्रोच्या कामामुळे अनेक झाडांची कत्तल झाली आहे. त्यावेळी झाडे तोडण्यासाठी परवानगी देण्यास समिती का नेमली नाहीर? सक्षम समितीने मंजुरी दिली आहे. सक्षम समितीने मंजुरी दिली असताना कामे का सुरु केली जात नाहीत. कामाला विलंब झाल्यावर पुन्हा मुदतवाढ, वाढीव खर्चा करायचा आहे का, कामे मुदतीत पूर्ण करणे गरजेचे आहे. परंतु, कामे सुरु का केली जात नाहीत. कोणाचे तरी हितसंबंध जोपासले जात आहेत.

मान्यता देवूनही वर्क ऑर्डर नाही
शाळा साफसफाईच्या कामाची निविदा काढली. त्याला स्थायी समितीने मान्यता देखील दिली. मात्र त्याची अद्यापही वर्क ऑर्डर दिली नाही. काम सुरु केले नाही. जाहिरात फलकाची निविदा काढली जात नाही. आकाश चिन्ह परवाना विभागाचे अधिकारी स्थायीच्या सभेला वारंवार दांडी मारतात. प्रशासन केवळ शहरात 400 अनधिकृत फलक असल्याचे सांगत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या स्थायी समिती अध्यक्षा सावळे यांनी उद्यान विभाग, आकाश चिन्ह विभागाला फैलावर घेतले. आयुक्तांना एक शब्द विचारला की ते केवळ भाषण देतात. भाषणाने भागत नाही, काम करावे लागते, असेही त्या म्हणाल्या.