सोयगाव । मराठवाड्यात 10 महिन्यात 80 शेतकर्यांच्या आत्महत्या झाल्यात. दिवसाला 3 शेतकरी आत्महत्या होत असतांना भाजप सरकार ठोस उपाय योजना करीत नाही, असा आरोप करीत शेतकर्यांचे प्रश्न मार्गी न लावल्यास अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी सरकारला सोयगाव येथे केला. शेतकरी व समान्यांच्या प्रश्नासाठी सोयगाव येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवार 16 रोजी जनआक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. अब्दुल सत्तार बोलत होते. जन आक्रोश मोर्च्यातील मागण्यांचे निवेदन तहसीलदार छाया पवार यांनी स्वीकारले त्यांच्या समवेत नायब तहसीलदार प्रभाकर गवळी, विठ्ठल जाधव यांची उपस्थिती होती
भाजप सरकार म्हणजे उधोगपतींना ’जिओ’ आणि शेतकर्यांनो ’मरो’
नोट बंदी, जीएसटी, परदेश दौरे व बुलेट ट्रेनसाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिले होते का? असा सवाल करीत उधोगपती वापरत असलेल्या वाहनांवर 6 टक्के जीएसटी आणि शेतकर्यांच्या अवजार तसेच ट्रॅक्टरवर 28 टक्के जीएसटी लावणारे भाजप सरकारचा कारभार काँग्रेस खपुन घेणार नाही असा इशारा माजी आ. कल्याणराव काळे यांनी यावेळी सरकारला केला. भाजप सरकार वर हल्लाबोल करीत असतांना आघाडी सरकारच्या काळात लाल्या रोग,दुष्काळ, गारपीट सारख्या अनुदानातुन शेतकर्यांना भरीव मदत करण्यात आली होती. 2014 नंतर भाजप सरकारने 1 रुपयाची ही मदत शेतकर्यांना केली नाही. उलट शेतकर्यांचाच पैसा लुटून भाजप सरकारने त्यांना रांगेत लावल्याचा आरोप माजी आ.कल्याणराव काळे यांनी सरकारवर केला.
शासनाने सोयगाव तालुका दुष्काळी जाहिर करावा
पुढे बोलतांना आ. अब्दुल सत्तार म्हणाले की, खासदार राहुल गांधी यांच्या प्रयत्नाने भाजप सरकारने 172 वस्तुवरील जीएसटी कमी केली. नोटबंदीने सर्वसामन्य नागरीका हवालदिल झाला आहे. 99 टक्के जुन्या नोटा जमा झाल्या तर त्या कोणाच्या होत्या हे सरकारने जाहिर करावे तसेच नोटबंदीमुळे गरीबांना काय फायदा झाला, असा सवाल करीत भाजप सरकार वर हल्ला चढवला. सोयगाव ला 50 टक्के आनेवारी येवून ही सरकार दुष्काळ जाहिर करीत नाही. दुष्काळ जाहिर न झाल्याने शेतकर्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून आम्ही कर्जदार शेतकर्यांचा विमा काढलेला आहे. सरकारने दुष्काळ जाहिर केला तर केवळ सोयगावला 62 कोटिहून अधिक रूपये मिळतील, असे स्पष्ट करीत 11 लाख कोटि रुपये खर्चून बुलेट ट्रेन केल्या पेक्षा शेतकर्यांचे कर्ज माफ़ करुन आत्महत्या रोका नसता अधिवेशन चालू देणार नाही असे आ. अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.
भाषणाद्वारे भाजपावर हल्लाबोल
यावेळी धरमसिंग चव्हाण, शांतिलाल अग्रवाल, देवीदास लोखंडे, दुर्गाबाई पवार, गणेश दौड, नामदेव सोन्ने, राहुल सावंत आदींनी आपल्या भाषणात सरकारच्या कारभारावर हल्लाबोल केला. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातुन मोर्च्याला सुरुवात करण्यात आले होते. मुख्य मार्गानी हा मोर्चा मार्गस्त होवून तहसिल कार्यालय समोर या मोर्च्याचे सभेत रूपांतर झाले. मोर्च्यात शेतकरी ट्रेक्टर, बैलगाडी घेवून सहभागी झाले होते. यावेळी शेतकरी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉँग्रेस चे तालुका अध्यक्ष प्रभाकर काळे यांनी केले. सूत्र संचलन योगेश पाटील यांनी केले तर शेवटी शहराध्यक्ष महेश चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यांची होती उपस्थिती
यावेळी माजी आमदार कल्याणराव काळे, सिल्लोड नगराध्यक्ष अब्दुल समीर सत्तार, सोयगाव कॉँग्रेस तालुकाध्यक्ष प्रभाकर काळे, पं.स.सभापती धरमसिंग चव्हाण, यांच्यासह देवीदास लोखंडे (सिल्लोड), जि.प.सदस्य गोपीचंद जाधव, सिल्लोड कृउबाचे उपसभापती नंदकिशोर सहारे, संचालक दामू गव्हाने, राहुल सावंत, गणेश दौड, शांतिलाल अग्रवाल, महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार, सिल्लोडच्या उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड, विमलबाई खैरनार, संध्या मापारी, बाबू चव्हाण, नगरसेवक लतीफ शहा, कृष्णा राउत, नंदू हजारी, रमेश गवंडे,मोतीराम पंडित, नामदेव सोन्ने, अक्षय काळे, सुनील तिडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.