सोयगाव। सोयगाव पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकारी यांची गुरुवारी तडकाफडकी बदली झाल्याने, सोयगावला पुन्हा फुलंब्रीचे गटविकास अधिकारी प्रकाश जोंधळे यांची प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून पदभार देण्यात आला आहे. जिल्हा परिषदेने सोयगाव पं.स.च्या प्रभारी गटविकास अधिकार्याच्या जागेवर पुन्हा प्रभारीच गटविकास अधिकारी दिल्याने शहरात चर्चेचा विषय ठरला होता.
सोयगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड या सहा महिन्यापासून प्रसूती रजेवर गेल्याने नागरिकांची कामे खोळंबू नये यासाठी कन्नडचे विस्तार अधिकारी अंबादास गायके यांना तीन महिन्यापूर्वी सोयगावचा प्रभार दिला होता. परंतु त्यांची अचानक पैठणला बदली करून फुलंब्रीचे गटविकास अधिकारी प्रकाश जोंधळे यांना गुरूवारी 27 जुलै रोजी सोयगाव पंचायत समितीचा प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून प्रभार दिला आहे. याकडे संबंधित लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. घरकुल योजनेचे धनादेश, स्वच्छ भारत अभियानाचे रक्कम, विहिरींचे अनुदान, कलाकारांचे मानधन आदींची कामे रखडली आहेत.