सोयगाव । सर्वसामान्यांशी निगडीत तालुक्याचे मिनीमंत्रालय म्हणून ओळख असलेल्या तहसील कार्यालयात पंधरा दिवसापासून अधिकारी, कर्मचार्यांच्या अंतर्गत कलहातून झालेल्या गटबाजीत तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांचे कामे मोठ्या प्रमाणावर रेंगाळल्याची धक्कादायक प्रकार गुरुवारी 2 ऑगस्ट समोर आल्याने सोयगावला खळबळ उडाली आहे. सोयगाव तहसील कार्यालयात अधिकारी व संबंधित विभागांचे कर्मचारी यांच्यात अस्तित्वाचे शीतयुद्ध पंधरा दिवसापासून रंगल्याने अंतर्गत कलह निर्माण झालेले आहे.याचा फटका सर्वसामान्य नागरिकांच्या कामांवर बसला असल्याने या अंतर्गत कलहाची किंमत शेतकर्यांना मोठ्या प्रमाणावर मोजावी लागत आहे. तहसील कार्यालयात महसूल, पुरवठा, संजय गांधी, श्रावण बाळ, उपकोषागार विभाग, दप्तर विभाग आदि विभाग आहे. परंतु कोणत्याही विभागातील सर्वसामान्य नागरिक व शेतकर्यांचे कामे खोळंबली आहे. अंतर्गत कलहातून नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरु असून शेतकर्यांची शेती संबंधी कामे, विद्यार्थ्यांचे शालेय प्रमाणपत्र आदि कामे साचून आहे.