सोयगाव। कपाशी उत्पन्नात अग्रेसर असलेल्या सोयगाव तालुक्यात हंगामीपूर्व लागवड केलेल्या कपाशी पिकावर बोंडअळीचा मोठा प्रादुर्भाव आढळून आल्याने ठिबकवर कपाशीची लागवड केलेल्या शेतकर्यांची चिंता वाढल्याने बोंडअळीच्या प्रादुर्भावाने उत्पन्न घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कडाक्याच्या उन्हाळ्यात पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करून वाढीस घातलेल्या कपाशीच्या झाडावर बोंडअळीचा प्रादुर्भाव शेतकर्यांसाठी धोक्याची घंटा झाला आहे. तालुक्यात 13 हजार हेक्टरवर ठिबक सिंचनवर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षात वाढलेली लागवड कपाशीचे विक्रमी उत्पन्न देणारी ठरली होती. परंतु अचानक या कपाशी पिकावर उत्पन्नाच्या वीस वर्षाच्या इतिहासात सोयगाव तालुक्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे.
कापसाच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता
बोंड अळीच्या प्रादुर्भावमुळे तालुक्यातील बनोटी, गोंदेगाव, भागात बोंडअळीचा वाढता प्रादुर्भाव या कपाशी पिकावर आढळून आला असल्याने शेतकर्यांमध्ये खळबळ उडाली आहे. फुलावर आलेल्या कपाशीवर फळधारणा होवू न देण्याचे कार्य या बोंडअळीचे आहे. त्यामुळे फुलाच्या गर्भातच कपाशीच्या कैर्यांचा नायनाट होत असल्याने उत्पन्न घटण्याची शक्यता शेतकर्यांमधून वर्तविण्यात येत आहे. वाढता बोंडअळीचा प्रादुर्भाव ठिबकच्या कापशीवरून कोरडवाहू लागवड केलेल्या कापूस पिकांवर झाल्यास सोयगाव तालुक्यातील कपाशी पिकांचे उत्पन्न धोक्यात येईल, यामुळे शेतकर्यांमध्ये भीती व्यक्त होत आहे.
सोयगाव भागात ठिबकवर लागवड केलेल्या कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या काही शेतांची पाहणी केली आहे. परंतु,आढळलेली अळीची प्रजात शेंद्रीय बोंडअळीची वाटते, सोयगाव भागात शेतकरी ठिबकच्या कपाशी पिकावर फरदडचे उत्पन्न घेतात यामुळेच बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे.
सुदाम घुले, तालुका कृषीअधिकारी, सोयगांव
वीस वर्षात पहिल्यांदाच प्रादुर्भाव
सोयगाव तालुक्यात कपाशीवर वीस वर्षात पहिल्यांदाच बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. यावर उपाय-योजना म्हणून तालुका कृषी विभागाकडून मार्गदर्शन होत नसल्याने शेतकरी मोठ्या पेचात अडकल्याने उच्च विषारी कीटकनाशक फवारणीचे कामे शेतकर्यांनी हाती घेतले आहे. जिल्हा प्रशासनाच्या कृषी विभागाने याकडे लक्ष देवून शेतकर्यांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.