सोयगाव । सोयगावसह तालुक्यात बिबट्याची दहशत कायम आहे. रविवारी 10 डिसेंबर कापूस वेचणी करणार्या महिला मजुरांना कंकराळा ता.सोयगाव शिवारात दुपारच्या सुमारास बिबट्या गुरगुरतांना आढळला.यामुळे खळबळ उडाली होती दरम्यान, 9 वासरू फस्त केलेल्या बिबट्याचे कंकराळा शिवारात वास्तव्य असल्याचे या महिलांनी सांगितले.मात्र वनविभाग सोयगाव परिसरातील वास्तव्य करणार्या बिबट्याला सहजपणे घेत असल्याने नागरिकांची दहशत वाढली आहे.बिबट्याच्या दहशतीमुळे कापूस वेचणी आणि रब्बी पिकांची मशागतीचे कामे अपूर्णावस्थेत असल्याने सोयगाव तालुक्यातील शेतकरी पुन्हा नवीन अडचणीने हवालदिल झाला आहे. दरम्यान चाळीसगाव तालुक्यात धुमाकुळ घातलेल्या बिबट्याला ठार करण्यात वनविभागाला यश आले असल्याने चाळीसगावकरांनी निश्वास सोडला आहे.
तालुक्यातील या भागात धुमाकूळ
सोयगाव-वेताळवाडी-गलवाडा, बहुलखेडा-निंबायती, कंकराळा, निमखेडी, वरठाण, किन्ही, बनोटी या भागात बिबट्याचा दररोज मुक्तसंचार आणि धुमाकूळ सुरु आहे.परंतु वनविभागाकडून यावर उपाय-योजना होत नसल्याने शेतकरी व शेतमजूर हवालदिल आहे.
बिबट्याचा मुक्तसंचार आणि धुमाकूळ
सोयगावसह तालुक्यात बिबट्याचा मुक्तसंचार आणि धुमाकूळ सुरु आहे. आठवड्याभरापासून बिबट्याने अनेकांना दर्शन दिले. शेती क्षेत्रात बिबट्याचा मुक्तसंचार मजुरांसाठी धोक्याचा ठरला आहे.सोयगाव शिवारात बिबट्याचा डरकाळ्या, कंकराळा ता.सोयगाव शिवारातील मुक्तसंचार यामुळे मजुरांसह, शेतकरी कचाट्यात सापडला आहे. परंतु वनविभाग मात्र याकडे डोळेझाक करत आहे. राखीव जंगलात बिबट्याचे वास्तव्य राहणारच हे वनविभागाचे वक्तव्य खरे आहे. परंतु त्यापुढेही वनविभाग बिबट्याला राखीव जंगलात जागा अपुरी पडत असल्याने शेती शिवारात बिबट्या येत असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. यावर मात्र उपाय-योजना करण्यासाठी वनविभाग अकार्यक्षम ठरत आहे. मागील आठवड्यात बहुलखेडा ता.सोयगाव शिवारात वगारीवर हल्ला चढवून बिबट्याने फस्त केल्याची घटना घडली बनोटी वनक्षेत्रातील वरठाण, बनोटी, घोसला आदि भागातील पशुजनावरील हल्ले अद्यापही शेतकर्यांच्या जखमा मिटलेल्या नाही.पाचोरा आणि सोयगाव हद्दीतील सीमावर्ती भागात निमखेडी शिवारात दोन्ही वनविभागांनी लावून ठेवलेला पिंजरा शोभेची वस्तू बनला आहे.
निमखेडीचा पिंजरा बनला शोभेची वस्तू
दरम्यान, निमखेडी ता.सोयगाव शिवारातील गायरान जमिनीवरील बिबट्याचा मुक्तसंचार पाचोरा आणि सोयगाव वनविभागाला ज्ञात आहे.आठवडाभरापासून जळगाव आणि औरंगाबाद वनपरिक्षेत्र विभागाकडून सीमावर्ती भागात बिबट्याला अडकविण्यासाठी पिंजरा उभा करण्यात आला आहे.परंतु या शिवारातील चतुर बिबट्याला वनविभागाच्या पिंजर्याला चकमा देवून भक्ष करत आहे. या पिंजर्यात बिबट्यासाठी भक्ष म्हणून ठेवलेल्या शेळी आणि कोंबडीची पिंजर्यातच उपासमार होत आहे.परंतु तरीही बिबट्या पिंजर्यात अडकेना हे विशेष.