सोयगाव। सोयगाव नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात रहिवास करणार्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दारिद्य्ररेषेखालील कुटुंबियांना रमाई आणि शबरी योजनेतून घरकुल योजनेचा लाभ मिळणार असल्याचे पत्र जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी सोमवारी 31 नगरपंचायतीला पाठविले असल्याची माहिती शिवसेना उपनगराध्यक्ष योगेश पाटील यांनी दिली. दरम्यान यानिर्णयामुळे शहरवासीयांचा घरकुल योजनेचा प्रश्न सुटला आहे. सोयगावला नगरपंचायत झाल्याने पंचायत समितीच्या सर्व योजनामधून शहराची वगळणी करण्यात आली होती. त्यामुळे शासनाच्या विविध योजनेसाठी शहरातील पात्र लाभार्थ्यांची मोठी कोंडी झाली होती. नगरपंचायत स्थापनेपासून या लाभार्थ्यांना दोन वर्षापासून भटकंती झाली होती. नगराध्यक्ष कैलास काळे, उपनगराध्यक्ष योगेश पाटील यांनी आयोजित नगरपंचायतीच्या बैठकीत संबंधित योजनांची अंमलबजावणीसाठीचा प्रस्ताव मंजूर करून जिल्हाधिकारी औरंगाबाद यांना पाठविला होता. नगरपंचायतीला घरकुल योजनांचे पत्र मिळताच सोमवारी 31 पासून लाभार्थ्यांच्या चाचपणीची प्रक्रिया हाती घेण्यात आल्याचे उपनगराध्यक्ष योगेश पाटील यांनी सांगितले.
प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाल्याने शहराला घरकुल योजनांची मान्यता मिळाल्याने लाभार्थ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. दरम्यान,विकासापासून कोसो दूर असलेल्या सोयगावच्या विकासाला पाणंदमुक्त योजनेत अव्वल ठरल्याने, शहरातील विकासासाठी भरघोस निधीची तरतूद करण्यात आली असून,शासनाची पाणंदमुक्त ही बंधनकारक अट होती. शहराने पाणंदमुक्त योजनेत पारितोषिक मिळविल्याने यापुढे विकासाला सुरुवात झाल्याचे उपनगराध्यक्ष योगेश पाटील यांनी सांगितले. परंतु शिवसेनेत दुफळी नसल्याची स्पष्टोक्ती उपनगराध्यक्ष योगेश पाटील यांनी दिली आहे. राज्यात सत्तास्थानी असलेल्या भाजपा व शिवसेना युतीत अनेकदा खटके उडत असतांना सोयगाव नगरपंचायतीतील भाजपा-शिवसेना युती मात्र कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.