सोयगाव । वाढत्या उन्हाच्या उष्णतेने लाहीलाही झालेल्या कपाशी पिकांना घाटे अळींचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने सोयगाव परिसरातील कपाशी पिकांची मोठी वाताहत झाली आहे. अळींच्या प्रादुर्भावाने ठिबकवर घेण्यात आलेल्या कपाशीची पाने कुरतडल्या जात असल्याने कपाशी उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे. यावर कृषी विभागाने उपाय-योजनेसाठी मार्गदर्शन करण्याची आवश्यकता असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. सोयगाव तालुक्यात बनोटी, सोयगाव मंडळात कपाशीची विक्रमी लागवड करण्यात आली आहे. पावसाने पाठ फिरविल्याने जेमतेम असलेल्या विहिरीच्या पाण्यावर या कपाशीची वाढ केली खरी,परंतु घाटे अळींचा वाढता प्रादुर्भाव आणि पाण्याची कमतरता यामुळे कपाशी पिके धोक्यात आली असतांनाच गेल्या चार दिवसापासून सोयगावला वाढलेला उन्हाचा पारा कपाशीसह मका पिकाला घातक ठरत आहे.
खरीपाची पिके धोक्यात
वाढत्या उन्हाने निंदनी करणारे मजूरही अडचणीत आल्याने सोयगावला उन्हाच्या फटक्याने निंदनी, खुरपणीचे कामे संकटात सापडली आहे. बनोटी, गोंदेगाव भागात पावसाने मोठा खंड पाडला. त्यामुळे पावसाच्या संकटाने बनोटी मंडळातील खरीपाची सर्वच पिके धोकादायक झाली आहे.पावसाची फिरवलेली पाठ, अळींचा वाढता प्रादुर्भाव आणि वाढत्या उन्हाची तीव्रता यामुळे सोयगाव तालुक्यातील पिके कोमेजू लागली असल्याने सोयगावला पुन्हा दुष्काळाची छाया पसरल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पावसाने सोयगावसह तालुक्याला 22 दिवसापासून खो दिला आहे. विहिरीतील पाणीसाठा संपला आहे.अनेक अडचणींवर शेतकर्यांना मात करण्यासाठी धैर्य शिल्लक राहिले नाही.