सोयगाव बसस्थानकासमोर मोबाईल शॉपी फोडली

0

सोयगाव । सोयगाव शहरातील बसस्थानकावरील मोबाईल शॉपीचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी एक लाख सहा हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना गुरुवारी 6 जुलैच्या मध्यरात्री सुमारास घडली. या चोरीच्या घटनेमुळे सोयगाव शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मोबाईल शॉपी चालक कादिर शहा यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी 7 जुलै रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील बसस्थानकावर शाही मोबाईल शॉपी आहे. रात्री नियमितपणे दुकानदार कादिर शहा यांनी दुकान बंद करून घरी गेल्यावर काही अज्ञात चोरट्यांनी दुकानावर पाळत ठेवून मध्यरात्री दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला.

घटनेचा पंचनामा करून अज्ञातांविरोधात गुन्हा
यामध्ये त्यांनी 16 हजार रूपये रोख, 15 मोबाईल अंदाजे किंमत 90 हजार 530, महत्वाची कागदपत्रे असा एकूण 1 लाख 6 हजार 530 मुद्देमाल लंपास केला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक डॉ.सुजित बडे, उपनिरीक्षक गणेश जागडे यांच्यासह पथकाने घटनेचा पंचनामा करून अज्ञात 3 ते 4 चोरट्याविरुद्ध चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. दरम्यान शहरात घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप वैराळे, गुन्हे अन्वेषण पथक आदींनी भेटी देवून पाहणी केली आहे. शहरातील चोरीच्या घटनेमुळे शहरातील सर्वच ठिकाणी पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. रात्रीची मोठी गस्त वाढविण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक डॉ.सुजित बडे यांनी सांगितले. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप वैराळे, पोलीस निरीक्षक सुजित बडे, उपनिरीक्षक गणेश जागडे, राजेंद्र किर्तीकर, संदीप चव्हाण, शिवदास गोपाळ, दिलीप तडवी, अविनाश बनसोडे, वैशाली सोनवणे आदी तपास करत आहे.