गुरांच्या गोंधळात विद्यार्थ्यांसह नागरीक त्रस्त
सोयगाव । सोयगाव शहरासह बसस्थानक परिसरात बुधवार १३ सप्टेंबर रोजी मोकाट गुरांनी मुक्तसंचार करून धुमाकूळ घातल्याने शहरवासी नागरीक त्रस्त झाले आहेत. दरम्यान शहरातून आलेल्या मोकाट गुरांनी व वळूंनी बसस्थानकाचा ताबा घेतल्याने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली होती. शहरात अनेक दिवसापासून मोकाट गुरांचा मोठा सूळसुळाट वाढला आहे.
शहरभर पळत सुटले वळूया मोकाट गुरांनी व वळूंनी शहरासह बसस्थानकात मुक्तसंचार करून धुमाकूळ घातला होता. या घटनेमुळे शहरवासीयामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. शाळा महाविद्यालयात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरल्याने बसस्थानक रिकामे झाल्याने जीव मुठीत घेवून प्रवाशांना सुरक्षितस्थळी जावे लागल्याने गोंधळ उडाला होता. नगरपंचायतीने मात्र यावर अद्यापही कोणतीच उपाय-योजना न केल्याने मोकाट गुरे व आक्रमक झालेले वळू शहरभर धावत सुटल्याने शहरात भीतीचे सावट पसरले होते. आठवडे बाजारातही या मोकाट गुरांचा प्रश्न कायम आहे.नगरपंचायतीने मात्र अद्यापही काहीही उपाय-योजना न केल्याने या मोकाट गुरांचा संचार वाढतच आहे. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सचिन तामखंडे मात्र यावर तोडगा काढण्यासाठी पावले उचलत नसल्याचा आरोप शहरवासीयांनी केला आहे.शहरातील मोकाट गुरांना तातडीने जेरबंद करून पकडण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
डुकरांचाही सुळसुळाट शहरात गावठी डुकरांचा मोठा उपद्रव वाढल्याने यामुळे दुर्गंधी वाढत आहे. डुकरे शहरातील नागरिकांच्या घराजवळ येवून मोठी घाण करत असल्याने दुर्गंधी पसरली आहे.मात्र मोकाट गुरांच्या प्रश्नासोबतच याकडेही नगरपंचायतीने दुर्लक्ष केल्याने शहरवासियांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शहरतील मोकाट गुरांना तातडीने जेरबंद करून गोशाळेत सोडण्याचा प्रस्ताव घेण्यात आला आहे, यावर तातडीने निर्णय घेण्यात येईल त्यामुळे शहरातील मोकाट गुरांच्या प्रश्नावर मार्ग काढण्याची तयारी नगरपंचायतीने केली आहे. – योगेश पाटील, उपनगराध्यक्ष नगरपंचायत