पशूवैद्यकिय अधिकारी उपलब्ध नसल्याने नागरीकांचा रोष
सोयगाव । येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात गेल्या तीन वर्षापासून पशुवैद्यकीय अधिकारी नाही. अनेकवेळा निवेदन देऊनही वैद्यकिय अधिकारी मिळत नसल्यामुळे संतप्त शेतकर्यांनी आज पंचायत समितीत बंद असलेल्या गटविकास अधिकार्यांच्या दालनाला बकर्या बांधुन कार्यालयास कुलुप ठोकले. सोयगांव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात तीन वर्षापासून पशुवैद्यकीय पद रिक्त आहे. तालुक्याचे ठिकाण असल्याने आजुबाजुच्या पंचवीस खेड्यातील पशुपालक या दवाखान्यावर अवलंबून आहे. यावेळी गणेश काळे, राजेंद्र दुतोंडे, सोपान गाजरे, विकास काळे, शालिक अप्पा देसाई, विनोद मिसाळ, अशोक चौधरी, सुनिल काळे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
पशूपालकांचे उपचाराविना हाल
शेती हा मुख्य व्यवसाय असल्यामुळे शेतीसाठी आणि जोडधंदा म्हणून गाई, म्हशी, बकर्या, कोंबडी असे पशु शेतकरी पाळतात. त्यासाठी शासनाच्या अनेक योजनाचा लाभ मिळविन्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी यांचे मार्गदर्शन गरजेचे असते. तसेच विविध लसीकरण व उपचारासाठी पशुवैद्यकीय अधिकारी आवश्यक आहे. परंतु गेल्या तीन वर्षापासून पशुवैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे पशुपालकांचे हाल होत आहे. अनेक योजनापासून शेतकरी वंचित राहत आहे. याविषयी पंचायत समिती, जिल्हा परिषद येथे अनेकवेळा निवेदन दिले, परंतु काहीच उपयोग झाला नाही.
नागरीक झाले संतप्त
आज संतप्त शेतकर्यांनी पंचायत समितीत बंद असलेल्या गटविकास अधिकार्यांच्या दालनाला बकर्या बांधुन कार्यालयास कुलुप ठोकले. सोमवारी याविषयी बैठक बोलावून समस्या सोडविल्या जाईल, असे आश्वासन दिल्यामुळे व फर्दापुर येथील पशुवैद्यकीय अधिकारी सय्यद यांना बोलावून बकर्यावर उपचार केल्यानंतर कुलुप उघडण्यात आले.