चाळीसगाव। औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव येथील 24 वर्षीय विवाहितेने 9 जून 2017 रोजी विषारी औषध सेवन केल्याने तिला चाळीसगाव येथे समर्थ हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान 10 जून रोजी विवाहितेचा सकाळी 6 वाजता मृत्यू झाला असून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला झिरो नंबरने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. धाप (ता.सोयगाव जि. औरंगाबाद) येथील विवाहित मनीषा गोकुळ महाजन (वय-24) या विवाहितेने 9 जून रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास धाप शिवारातील शेतात विषारी औषध सेवन केल्याने त्यांना उपचारासाठी चाळीसगाव येथील समर्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
उपचार सुरु असताना 10 जून रोजी सकाळी 6 वाजता त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह सकाळी 9:15 वाजता चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात नेल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.पी.बाविस्कर यांच्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला झिरो नंबरने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास पोउनि विजयकुमार बोत्रे व हवालदार प्रदीप परदेशी करीत आहेत.