सोयगाव येथे मोर जखमी अवस्थेत आढळला

0

सोयगाव। शिवारातील एका कापसाच्या शेतात जखमी अवस्थेत मोर आढळला. मोराला ताब्यात घेण्यासाठी वनविभागाच्या पथकाची मोठी धांदल उडाली होती. शेतकर्‍यांनेच या मोराला पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले. सोयगाव-शेंदुर्णी रस्त्यालगत शेतकरी हितेश कुलकर्णी यांच्या कापसाच्या शेत आहे.

या शेतात धावून दम लागलेला नर प्रजातीचा मोर दबा धरून बसलेल्या अवस्थेत हितेश कुलकर्णी यांना आढळून आल्याने त्यांनी तातडीने वनविभागाला घटनेची माहिती दिली. वनविभागाचे वनरक्षक रफिक पठान यांचेसह पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेवून जखमी मोराला पकडून उपचारासाठी सोयगावच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करून त्याचेवर उपचार केले. त्यानंतर काही कालावधीत त्या जखमी मोराला वनविभागाच्या नर्सरीत मुक्तसंचारासाठी सोडण्यात आले.